
मुंबई : मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमराठी विरोधी सूर आळवताना मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. मात्र त्यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी जोरदार प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "राज ठाकरे यांचे मराठी प्रेम हे फक्त निवडणुकीपुरतेच असते," असा थेट आरोप करत, "जो राज ठाकरेंसोबत जाणार, तो संपणार," असा घणाघात तिवारी यांनी केला.
मीरा भाईंदर येथील राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनोज तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, "राज ठाकरे या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या एकात्मतेला तोडणारे आहेत. त्यांच्या प्रवृत्तीला महाराष्ट्राची जनता कधीच स्वीकारणार नाही." त्यांनी राज ठाकरे यांचा हिंदी विरोध आणि मराठी प्रेम 'सिझनल' असल्याचा आरोप केला. तिवारी म्हणाले की, "निवडणुकीच्या वेळीच त्यांना मराठी अस्मिता आठवते. बाकी वेळी ते गायब असतात."
राज ठाकरे यांच्या राजकीय घसरणीबाबत बोलताना तिवारी म्हणाले, "सुरुवातीला त्यांनी चांगल्या मुद्द्यांवर बोलून १३ आमदार निवडून आणले. मात्र नंतर उत्तर भारतीयांविरोधातील हल्ल्यांमुळे जनतेने त्यांना बाजूला केले. त्यामुळेच आज त्यांच्या पक्षात एकही प्रभावी आमदार नाही." मनोज तिवारींनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची आठवण करून दिली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, "राज ठाकरे यांच्यासारख्या प्रवृत्तीला महाराष्ट्राची जनता स्वतः शिक्षा करत आली आहे आणि पुढेही करेल."
तिवारी पुढे म्हणाले, "राज ठाकरेंना कोणीही गंभीरपणे घेत नाही. ते आता राजकारण्याच्या कचराकुंडीत गेले आहेत. अशा व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये, हीच माझी प्रार्थना आहे."
राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पलटवार करत तिवारी म्हणाले, "मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृती यांचे खरे रक्षण भारतीय जनता पक्ष करत आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून केवळ तिचा वापर केला जातो, आदर नाही."
राज ठाकरे यांच्यावर इतक्या तीव्र शब्दांत टीका केल्यानंतर आता मनसेकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठी-हिंदी वादाचा धगधगता मुद्दा उफाळून येण्याची शक्यता आहे.