दोन पैसे हाती आले की मस्ती येते, अजित पवारांचा बजरंग सोनावणेंवर हल्लाबोल

बीडमध्ये दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंवर निशाणा साधला आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : May 11, 2024 9:52 AM IST

बीड : बीडमध्ये दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंवर निशाणा साधला आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 'मोदींच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना घेण्यासाठी मी प्रयत्न करणार असे आश्वासन देखील दिले आहे.

अजित पवार म्हणाले, पंकजाताईच्या विरोधात बजरंग सोनावणे उभा आहे तो सारखा माझ्याकडे येऊन माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या अशी मागणी करत होता. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडेंनी वाढवून द्यायला सांगितली. मी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की वेसन हातात ठेवायला पाहिजे होते. धनुभाऊला कधी माणसं कळत नाही, म्हणून त्याची गाडी बिघडते. तू माझा सल्ला घेत जा.

अजित पवार पुढे म्हणाले, बजरंगा तू सांगायाचा छाती पडला की हे दिसतो तो दिसतो.. अरे छाती फाडू नको छाती पडली की मरून जातो... तू स्वत:ला हनुमान समजायला लागला.. बजरंग सोनावणेचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सगळ बर चालले होते, त्याला काय अवदसा आठवली काय माहिती आणि निवडणुकीला उभा राहिला. परंतु काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे मस्ती त्याला आली. अरे हा पट्ठ्या स्वत: खासदारकीला पडला. स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत सदस्य करू शकला नाही. स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत, नगरपालिकेला निवडून आणू शकला नाही तो खासदार बनायला निघाला, असेही अजित पवार म्हणाले.

Share this article