कोल्हापूर जिल्ह्यात कलम 163 लागू, तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास कारवाई

किल्ले विशाळगड अनाधिकृत अतिक्रमणाबाबत तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून सामाजिक अस्थिरता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Rameshwar Gavhane | Published : Jul 17, 2024 1:12 PM IST / Updated: Jul 17 2024, 06:43 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले आहे. यानुसार 17 जुलै दुपारी दोन वाजल्यापासून कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे आणि कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्येवरील विषयाच्या अनुषंगाने व समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग प्रदर्शित करणेस मनाई करण्यात आली आहे.

किल्ले विशाळगड अनाधिकृत अतिक्रमणाबाबत तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून सामाजिक अस्थिरता, तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कलम 163 जारी करण्यात आले आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी 14 जुलै गजापुरात प्रचंड हिंसाचार झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नासधुस करण्यात आली होती. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करत अचानक दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान केले होते.

आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई

वरील सर्व घटनांचे व्हिडीओ, रिल्स, फोटो इत्यादीचे काही लोक सोशल मीडियातून व्हायरल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यात हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223 मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये फौजदारी कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात नमूद केले आहे.

कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वाच्या चौकशीची गरज

विशाळगडवर झालेल्या हिंसचारानंतर शाहू महाराज यांनी मंगळवारी पाहणी केली. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वांची चौकशी करण्याची गरज असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी वरील वक्तव्य केले. पोलीस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे जी माहिती होती ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती आणि माध्यमांना सुद्धा सांगितल्याचे मुश्रीफ म्हणाले.

आणखी वाचा : 

मुंबई मेट्रो-3च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, तावडेंनी ट्विट करुन दाखवली पहिली झलक

Share this article