
मुंबई : राज्यातील गाजत असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. नियमांची अंमलबजावणी सुरू होताच अनेक पात्र महिलांना वगळण्यात आले, पण दुसरीकडे सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीच या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. सध्याच्या आणि निवृत्त मिळून तब्बल 9,526 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
त्यापैकी 1,232 महिला निवृत्त असून त्या आधीच निवृत्तीवेतन घेत असतानाही योजनेच्या 1500 रुपयांचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. तर 8,294 महिला सध्या सरकारी सेवेत असतानाही या योजनेंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेसाठी पात्र असल्याचे भासवत लाभ घेतल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील एकूण रक्कम 12 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
याआधी तब्बल 14,000 पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनेचा असा गैरवापर होत असताना, सरकारने काय कारवाई करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या योजनेतील जाहिरातबाजीतील भ्रष्टाचारावरही बोट ठेवले आहे. त्यांनी दावा केला की, 15 ऑगस्ट 2024 रोजीच्या जीआरनुसार जाहिरातीसाठी 200 कोटी रुपये मंजूर होते, पण निविदा प्रक्रियेविना इतर संस्थांना काम देण्यात आले, जो भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाणार का? गैरफायदा घेतलेल्या पुरुषांविरोधात गुन्हे दाखल होतील का? आणि जाहिरात प्रकरणात दोषींवर कारवाई होणार का? हे सारे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.