सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा भरला उमेदवारी अर्ज, संसदेत बॅकडोअरने एन्ट्री करणार

बारामतीला आता दोन खासदार मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत संसद गाठली. आज सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबतचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधानभवनात आज राज्सभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत होती. अखेर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रह धरला होता.

पुणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

 आणखी वाचा :

Lok Sabha Election 2024 : मोदींचे 20 मंत्री पराभूत, राजीव चंद्रशेखर यांचे मताधिक्य होते सर्वात कमी

Share this article