Contact Lens : पावसाळ्यात कॉन्टेक्ट लेन्स वापरताय? 'या' ७ नियमांचं पालन कराच, अन्यथा डोळ्यात संसर्गाची शक्यता

Published : Aug 20, 2026, 06:04 PM IST
Contact Lenses

सार

Contact Lenses Eye Care : तुम्ही पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. याबाबत डॉक्टर काय सांगतात? कोणत्या गोष्टी टाळाव्यात? ७ महत्त्वाच्या सवयींकडे लक्ष द्या.

मुंबई : मुंबईत पावसाळ्याच्या दिवसांत चष्मा घालून प्रवास करताना काही अडचणी येतात. या दिवसांत डोळ्यांवरील चष्म्यावर वाफ साचते. पाण्याचे थेंब पडल्याने समोरील नीट दिसत नाही. चष्मा वारंवार पुसावा लागतो. अशावेळी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं सोपं वाटतं.

लेन्समुळे चष्म्याशिवायही समोरचं स्पष्टपणे दिसतं. मात्र पावसाळ्यातील ही सोय बरेचदा घातकही ठरते. या दिवसांत कॉन्टेक्ट लेन्स वापरणं सोयीस्कर असलं तरीही नकळत होणाऱ्या चुकांमुळे खालील काही समस्यांना सामोरं जावं लागतं -

- ओल्या हातांनी लेन्स काढणे किंवा लावणं

- पावसात पूर्ण भिजल्यानंतरही डोळ्यांत लेन्स ठेवणं

- लेन्स ठराविक मर्यादेपेक्षाही जास्त काळ वापरणं

- लेन्सची योग्य स्वच्छता राखण्यास टाळाटाळ करणं

पावसाळी दमट वातावरणात योग्य निगा न राखल्याने या छोट्या चुकांमुळेही डोळ्यांची जळजळ होऊ शकते. डोळ्यांना संसर्ग होण्याची भीती ओढावते. याबद्दल मॅक्सव्हिजन सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटलचे डॉ. नितिन देढिया (Dr. Niteen Dedhia) यांनी आपले मत मांडलं. ते म्हणाले, “पावसाळ्यात डोळ्यांत पाणी गेल्याने दूषित घटक कॉर्नियाच्य संपर्कात येतात. हे घटक तिथेच साचून राहतात. ओल्या हातांनी लेन्स हाताळणं, पावसात भिजल्यावरही लेन्स घालणं किंवा नळाच्या पाण्याने लेन्सचा डबा धुणं यामुळे सूक्ष्मजीव आणि घाण हे लेन्सवर साचून राहतात. त्यामुळे डोळे लाल होणं, प्रकाशाचा त्रास होणं, धुसर दिसणं या किरकोळ गोष्टी नसून, धोक्याचा इशारा देत असतात. नळातील पाण्याशी लेन्सचा संपर्क होता कामा नये. डॉक्टरांनी दिलेले सोल्यूशनच लेन्स साफ करण्यासाठी वापरावं. डोळे पूर्णपणे बरे होईपर्यंत चष्मा वापरणं हाच सुरक्षित उपाय असतो.”

पावसाळ्यात कॉन्टेक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी खालील सात नियम अवश्य पाळावेत -

पावसाचे पाणी आणि कॉन्टेक्ट लेन्स यांचा संपर्क टाळा -

डोळ्यांसाठी पावसाचं पाणी धोकादायक असतंच असं नाही. परंतु शहरांमध्ये पावसाच्या पाण्यात धूळ, प्रदूषण आणि सूक्ष्मजीव असतात. असलं पाणी डोळ्यांत गेल्यास कॉन्टेक्ट लेन्सचे कण डोळ्याच्या पृष्ठभागावर अडकवू शकतात. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला - पावसाचं पाणी लेन्सवर पडल्यास चेहरा पुसून घ्या. पुन्हा तेच लेन्स वापरू नका.

ओले हात स्वच्छ हात करणं -

अनेकजण भिजलेल्या हातांनी छत्री, रेल्वेचं हँण्डल किंवा मोबाईलला स्पर्श केल्यानंतर लेन्स वापरतात. ही सवय धोकादायक ठरू शकते.

तज्ज्ञांचा सल्ला - लेन्सला हात लावण्यापूर्वी स्वच्छ पाण्यात साबणाने हात धुवा. स्वच्छ, कोरड्या आणि धागे न सुटणा-या टॉवेलने हात पुसा. जंतू ओल्या हातांमधूनही लेन्सवर जाऊ शकतात.

नळाच्या पाण्याने लेन्सचा डबा धुवू नका -

नळाच्या पाण्याने लेन्सचा डबा धुतल्यास स्वच्छ होत असला तरीही नळाचं पाणी निर्जंतुक नसतं. त्यामुळे नळाच्या पाण्यातील सूक्ष्मजीव लेन्सच्या डब्यात जाऊ शकतात. नंतर लेन्सवर चिकटू शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला - नेत्रतज्ज्ञांनी दिलेलं निर्जंतुक लेन्स सोल्यूशनच वापरा. प्रत्येक वापरानंतर डब्यातील सोल्युशन टाकून द्या. डबा योग्य पद्धतीने स्वच्छ करा. हवेत वाळल्यानंतर वापरायला घ्या.

नवीन सोल्युशन जुन्यामध्ये मिसळू नका -

नवीन सोल्युशन जुन्या सोल्युशनमध्ये मिसळल्याने लेन्स स्वच्छ होत नाहीत. जुन्या सोल्युशनमध्ये घाण किंवा सूक्ष्मजीव असू शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला - प्रत्येक वापरानंतर जुनं सोल्यूशन फेकून द्या. प्रत्येक वेळी ताजं निर्जंतुक सोल्युशन वापर. डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी ही सवय मोलाची ठरते.

जास्त काळ लेन्स वापरू नका -

तासनतास काम करणं, वाहतूक कोंडी आणि उशिरा घरी पोहोचल्यामुळे अनेकजण सतत लेन्स वापरतात. काहीजण लेन्स वापरुनच झोपतात. जास्त काळ लेन्स वापरल्याने डोळ्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. डोळे कोरडे पडतात. परिणामी डोळ्यांना त्रास होत संसर्गाचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुन्हा वापरता येणारे लेन्स वापरा, जतन करा आणि बदला.

तज्ज्ञांचा सल्ला - डेली डिस्पोजेबल लेन्स एकदाच वापरा. ते पुन्हा स्वच्छ करून वापरू नका.

डोळ्यांची निगा राखणारे साहित्य सोबत बाळगा -

या दिवसांत छोट्या आकाराचा वॉटरप्रुफ पाऊच सोबत बाळगा. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या अडचणी टाळता येतात. पाऊचमध्ये दोन चष्मे, स्वच्छ कॉन्टॅक्ट लेन्सचा डबा, ताजं निर्जंतुक लेन्स सोल्युशन, धागे न सुटणारा स्वच्छ कापड या वस्तू असाव्यात.

तज्ज्ञांचा सल्ला - लेन्स वापरताना त्रास जाणवल्यास किंवा त्यावर पाणी पडल्यास स्वच्छ आणि कोरड्या हातांनी लेन्स वापरा. त्याऐवजी चष्मा वापरा. डेली डिस्पोजेबल लेन्स फेकून द्या. पुन्हा वापरता येणारे लेन्स योग्य पद्धतीने स्वच्छ करा.

डोळ्यांमधील वाढता आजार वेळीच ओळखा -

दिवसभर लेन्स वापरल्यानंतर डोळे कोरडे पडणं सामान्य असू शकतं. डोळे लाल होणं, वेदना होणं, जास्त पाणी येणं, धूसर दिसणं किंवा प्रकाशाचा त्रास होणं ही लक्षणं दुर्लक्षित करु नका. ही डोळ्यांच्या संसर्गाची किंवा इतर गंभीर समस्येची चिन्हं असू शकतात. अशा वेळी तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तज्ज्ञांचा सल्ला - दिवसभर लेन्स वापरल्यानंतर काही मिनिटांसाठी डोळे कोरडे पडतात. ही सामान्य स्थिती आहे. मात्र वरील लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं डोळ्यांना संसर्ग किंवा गंभीर आजार उद्भवल्याचे संकेत देतात. अशा वेळी तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मुंबईत प्रवास करताना पावसात भिजणं टाळता येत नाही. मात्र या दिवसांत डोळ्यांचा संसर्ग टाळता येतो. कॉन्टॅक्ट लेन्सचा सुरक्षित वापर करता येतो. त्याकरता लेन्सची योग्य काळजी घ्यायला हवी. लेन्स वापरताना स्वच्छतेचं पालन करा. लेन्सचा नळाच्या पाण्याशी किंवा अस्वच्छ पाण्याशी संपर्क होऊ देऊ नका. डोळ्यांना त्रास होत असल्यास त्वरित लेन्स काढा. अशा वेळी चष्मा वापरणं सुरक्षित मानलं जातं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Vastu Tips : पलंगाखाली चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, घरात येईल गरिबी आणि आजारपण!
किचन-बाथरूमच्या नळांवरचे हट्टी डाग मिनिटांत होतील गायब, अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा असा करा वापर