Pet Care Business: फक्त २० दिवसांत मांजरांमुळे तरुणानं कमावले २० लाख!

Published : Mar 05, 2026, 03:50 PM IST
Shanghai Man Earns 20 Lakh Rupees in 20 Days with Pet Sitting Business

सार

Shanghai Man Earns 20 Lakh Rupees in 20 Days with Pet Sitting Business: चीनच्या शांघाईमधील हुआन कांग नावाच्या एका तरुणाने सुट्ट्यांमध्ये लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या मांजरांची काळजी घेतली आणि फक्त २० दिवसांत तब्बल २० लाख रुपये कमावले आहेत.

चीनमध्ये घडलेली ही घटना सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. आपण सहसा मांजराला दूध-पाणी देतो, पण याच मांजरांमुळे एक तरुण चक्क लखपती झाला आहे! शांघाईमध्ये राहणाऱ्या हुआन कांग नावाच्या या तरुणाने नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये मांजरांना खाऊपिऊ घालून तब्बल १.६० लाख युआन (म्हणजे जवळपास २० लाख रुपये) कमावले आहेत. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे.

९ वर्षांचा अनुभव, २० दिवसांचा 'जॅकपॉट'!

१९९१ साली जन्मलेल्या हुआन कांगने पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याच्या व्यवसायात एक नवीन विक्रम केला आहे. गेल्या ९ वर्षांपासून तो या क्षेत्रात काम करतोय. जसं आपल्याकडे दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत लोक गावी जातात, तसंच चीनमध्ये 'स्प्रिंग फेस्टिव्हल'च्या काळात लोक फिरायला बाहेर जातात. अशावेळी त्यांच्या घरातील मांजरांची काळजी घेण्यासाठी हुआनने 'घरोघरी जाऊन सेवा' देण्यास सुरुवात केली. यावर्षीच्या सुट्ट्यांमध्ये तर त्याला प्रचंड मागणी आली!

झोपेविना रात्री, २,००० घरांना भेट!

सुट्ट्यांच्या काळात हुआन आणि त्याच्या चार जणांच्या टीमने शांघाईमध्येच थांबून काम केलं. त्या २० दिवसांत त्यांनी तब्बल २,००० घरांना भेट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यापैकी जवळपास १,००० घरांची जबाबदारी हुआनने एकट्याने सांभाळली होती. यासाठी तो रोज पहाटे ३ वाजता उठायचा आणि रात्री ११ वाजेपर्यंत काम करायचा. दिवसाला फक्त ३-४ तास झोप घेऊन त्याने दररोज ५५ ऑर्डर्स पूर्ण केल्या.

फक्त खाऊ घालणं नाही, ही आहे 'फुल सर्व्हिस' केअर!

प्रत्येक घरी १० ते १५ मिनिटं देणारा हुआन फक्त मांजरांना खाऊ घालून थांबत नाही. तो मांजरांच्या आरोग्याची तपासणी करतो, त्यांचं 'लिटर बॉक्स' (शौचालय) स्वच्छ करतो, नखं कापतो आणि इतकंच नाही, तर घरातील खिडक्या आणि विजेची उपकरणं सुरक्षित आहेत की नाही, हेही तपासतो. त्याच्या याच प्रामाणिक सेवेमुळे ८० टक्क्यांहून अधिक ग्राहक पुन्हा पुन्हा त्याच्याकडेच येतात.

पाळीव प्राणी म्हणजे कुटुंबाचा भाग: वाढल्या रोजगाराच्या संधी!

आजकाल लोक पाळीव प्राण्यांना फक्त प्राणी म्हणून नाही, तर आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. त्यामुळेच, सुट्ट्यांच्या दिवसांत त्यांच्या देखभालीसाठी हुआनसारख्या विश्वासू लोकांची मागणी वाढली आहे. हुआन कांगची ही यशोगाथा हेच सांगते की, थोडा हटके विचार केला तर पाळीव प्राण्यांच्या व्यवसायातूनही लाखो रुपये कमावता येतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

साडी-सूटवर घाला हे Polki Earrings, दिसाल रॉयल
बाल्कनीसाठी लावा गुलाबापेक्षाही सुंदर दिसणारी ही ७ फुलझाडं