
Samsung Galaxy Z Tri Fold May Launch Soon : दक्षिण कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी सॅमसंग लवकरच एक ट्राय-फोल्ड फोन लाँच करणार असल्याचे रिपोर्ट्स आहेत. कंपनीने अलीकडेच एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC) परिषदेत हा स्मार्टफोन प्रदर्शित केला होता. याला सॅमसंग गॅलेक्सी झेड ट्राय-फोल्ड म्हटले जात आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार, सॅमसंगचा हा पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन सुरुवातीला मर्यादित संख्येत तयार केला जाण्याची शक्यता आहे.
द इलेकने दिलेल्या रिपोर्टनुसार, सॅमसंगने आपल्या पहिल्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनसाठी आतापर्यंत सुमारे 30,000 पार्ट्स तयार केले आहेत. ही संख्या एका फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या सामान्य उत्पादनापेक्षा खूपच कमी आहे. यावरून असे सूचित होते की सॅमसंग गॅलेक्सी झेड ट्राय-फोल्ड सुरुवातीला कमी प्रमाणात तयार केला जाईल. ग्राहकांच्या प्रतिक्रियेनंतर कंपनी उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते.
APEC परिषदेत सादर केलेला गॅलेक्सी झेड ट्राय-फोल्ड, सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट फोल्डेबल मॉडेल असेल अशी अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये 10-इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो, जो तीन भागांमध्ये फोल्ड करता येईल. यात ड्युअल-हिंज सिस्टीम आहे, ज्यामुळे 6.5-इंचाच्या फोल्ड केलेल्या डिस्प्लेवरून 10-इंचाच्या टॅब्लेटसारख्या स्क्रीनमध्ये बदल करता येतो. फोल्डेबल तंत्रज्ञानातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. फोल्ड केल्यावर, तो सामान्य बार-स्टाईल स्मार्टफोनसारखा दिसतो आणि कंपनीच्या गॅलेक्सी झेड फोल्ड 7 सारखाच आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 ऐवजी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन एलीट 4 गॅलेक्सी प्रोसेसर वापरला जाईल. हीच चिप सॅमसंगच्या नवीनतम फ्लॅगशिप फोनमध्येही आहे.
नवीन रिपोर्ट्सनुसार, सॅमसंगचे मुख्य लक्ष ट्राय-फोल्ड स्मार्टफोनच्या मोठ्या प्रमाणातील विक्रीपेक्षा बाजारातील प्रतिक्रिया तपासण्यावर आहे. या डिव्हाइसचे गुंतागुंतीचे इंजिनिअरिंग आणि 2,500 यूएस डॉलर (सुमारे 2,21,700 रुपये) अंदाजित किंमत ही सॅमसंग गॅलेक्सी ट्राय-फोल्ड फोनच्या मर्यादित रिलीझ योजनेमागील मुख्य कारणे असल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.