
Driving License : देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार एक मोठी योजना आखत आहे. चालकांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी 'ग्रेड-बेस्ड ड्रायव्हिंग लायसन्स सिस्टीम' लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, या नव्या प्रणालीनुसार वाहतुकीचे काही विशिष्ट नियम मोडल्यास चालकाचं लायसन्स रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल.
गडकरी म्हणाले, 'आम्ही ही योजना लवकरच लागू करणार आहोत. यामध्ये प्रत्येक ड्रायव्हरला काही पॉइंट्स दिले जातील. प्रत्येक वेळी अपघात झाल्यावर किंवा वाहतुकीचा नियम मोडल्यावर हे पॉइंट्स कमी होत जातील. जेव्हा सगळे पॉइंट्स संपतील, तेव्हा त्या ड्रायव्हरचं लायसन्स ६ महिन्यांसाठी निलंबित केलं जाईल किंवा थेट रद्द केलं जाईल.'
गडकरींनी देशातील अपघातांची धक्कादायक आकडेवारीही सादर केली. ते म्हणाले, 'भारतात दरवर्षी ५ लाख अपघात होतात आणि त्यात १.८ लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील ७२% मृत्यू १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे असतात, तर १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या १०,११९ मुलांचाही यात बळी जातो. हेल्मेट न घातल्यामुळे ५४,१२२ लोकांचा जीव गेला आहे. सीट बेल्ट न लावल्यामुळे १४,४६६ मृत्यू झाले, तर अतिवेगामुळे तब्बल १.२ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.'