
New Hyundai Creta: ह्युंदाई ही दक्षिण कोरियाची बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असून, ती जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. 1967 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी भारतासह जगभरात लोकप्रिय कार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात मारुती सुझुकीनंतर ती दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक आहे. ह्युंदाई आपल्या गाड्यांमधील आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससाठी ओळखली जाते. चेन्नईमध्ये ह्युंदाईचा मोठा उत्पादन प्रकल्प असून पुण्यातील जनरल मोटर्सचा प्लांट विकत घेतला आहे. आता तिथेही उत्पादन सुरू केले आहे.
सध्या Hyundai Creta ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मिड-साईज एसयूव्हींपैकी एक आहे. जानेवारी 2026 मध्ये सुद्धा या गाडीने Kia Seltos, मारुती ग्रँड विटारा आणि टाटा हॅरियर सारख्या गाड्यांना मागे टाकले आहे. आता Hyundai Creta पूर्णपणे नवीन रूपात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन पिढीच्या Hyundai Creta ची चाचणी सुरू झाली आहे. नवीन क्रेटा अनेक वेळा टेस्टिंग करताना दिसली आहे. 2027 पर्यंत नवीन क्रेटा लॉन्च होण्याची शक्यता आहे.
नवीन पिढीच्या Hyundai Creta मध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, नवीन क्रेटामध्ये नवीन डिझाइन असेल. फीचर्स आणि टेक्नॉलॉजीमध्येही मोठे अपडेट्स मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नवीन क्रेटामध्ये हायब्रीड इंजिनचा पर्याय दिला जाऊ शकतो. मात्र, Hyundai ने याबाबत कोणताही तपशील उघड केलेला नाही. क्रेटामधील अपडेट्स हे नुकत्याच नवीन अवतारात लॉन्च झालेल्या नवीन पिढीच्या Kia Seltos प्रमाणे असण्याची शक्यता आहे.
नवीन Hyundai Creta च्या टेस्टिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये क्रेटा पूर्णपणे झाकलेली असली तरी, अनेक अपडेट्स दिसून येतात. सर्वात आधी, नवीन क्रेटामध्ये 235/45 सेक्शन टायर्ससह नवीन डिझाइनचे 19-इंचाचे ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळण्याची अपेक्षा आहे.
टेस्टिंग मॉडेलची लांबी आणि रुंदी सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त आहे. हे बदल नवीन Kia Seltos मध्ये केलेल्या बदलांसारखेच आहेत. Hyundai आणि Kia या सिस्टर कंपन्या आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. Creta आणि Seltos एकाच प्लॅटफॉर्मवर तयार केल्या आहेत आणि त्यांचे इंजिन, गिअरबॉक्स स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. आगामी क्रेटामध्ये नवीन सेल्टोसप्रमाणेच फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
नवीन Hyundai Creta मध्ये फीचर्सच्या बाबतीतही मोठे अपडेट्स मिळू शकतात. यामध्ये नवीन सेल्टोसप्रमाणे ड्युअल-स्क्रीन सेटअप दिला जाऊ शकतो. नवीन कनेक्टेड कार फीचर्स, ADAS सेफ्टी फीचर्स, साईड पार्किंग सेन्सर्स, फ्रंट आणि रिअर डॅशकॅम आणि 10-वे ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन Hyundai Creta मधील सर्वात मोठा अपडेट हायब्रीड इंजिन असेल. Hyundai आपल्या 1.5-लिटर पेट्रोल इंजिनला हायब्रीड तंत्रज्ञानासह अपडेट करू शकते. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे पर्याय कायम राहतील, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.