
Diwali 2025: दिवाळीला आता फक्त काही दिवस उरले आहेत. रोषणाई आणि फटाक्यांसोबतच मिठाई आणि विविध पदार्थ हे दिवाळीचा अविभाज्य भाग आहेत. आपण घरी अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो. पण चविष्ट पदार्थ बनवण्यापूर्वी स्वयंपाकघर आणि घर स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
स्वयंपाकघरात काउंटरटॉपचा वापर सतत होत असतो. त्यामुळे त्यावर ओलावा आणि अन्नाचे कण साचतात. व्हिनेगर वापरून तुम्ही ही जागा स्वच्छ करू शकता. व्हिनेगर पाण्यात मिसळून त्याने काउंटरटॉप पुसून घ्या. यामुळे काउंटरटॉप चमकदार होतो आणि जंतूमुक्त होण्यासही मदत होते.
तेलकट पदार्थ बनवताना तेल भिंती, टाइल्स आणि गॅस शेगडीवर चिकटते. गरम पाण्याचा वापर करून हा तेलकटपणा सहज काढता येतो. तेलकट झालेल्या जागा गरम पाण्यात बुडवलेल्या कापडाने पुसून घ्या.
घरातील शेल्फ्स साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या. त्यानंतर त्यावर टॉवेल किंवा पेपर अंथरा. यामुळे साफसफाईचे काम सोपे होते.
स्वयंपाकघरात सिंकमध्ये सर्वाधिक घाण साचते. त्यामुळे ते वेळोवेळी स्वच्छ न केल्यास तिथे घाण आणि डाग जमा होतात व जंतू वाढतात. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरून सिंक स्वच्छ केल्यास ते चमकदार होईल.
गॅस शेगडीच्या बर्नर रिंग्स काढून गरम साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्या चांगल्या घासून धुवा. नंतर गॅस शेगडीचा पृष्ठभाग चांगला पुसून स्वच्छ करा.
घरातील उपकरणे, स्विच, हँडल, दारे आणि खिडक्या स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष द्या. यावर भरपूर धूळ आणि जंतू असू शकतात. स्वच्छ घर सणांचा आनंद द्विगुणीत करते.