
मुंबई : लिव्हरमध्ये म्हणजेच यकृतात जास्त प्रमाणात चरबी साचण्याला फॅटी लिव्हर म्हणतात. अति प्रमाणात कॅलरी घेणे, मधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि मद्यपान यांसारख्या कारणांमुळे अनेकदा लिव्हरमध्ये चरबी साचते. अनेक रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरची काहीच लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराचे निदान होत नाही.
आजार जसजसा बळावतो, तसतसे त्वचा पिवळी पडू शकते. लिव्हरचे काम बिघडते, तेव्हा त्वचेखाली बिलीरुबिन जास्त प्रमाणात साचते. त्याचप्रमाणे पोटात सूज येणे, पोट फुगणे, पोटदुखी, मळमळ आणि रक्तस्त्राव ही काही लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात. कोणतीही लक्षणे न दिसता फॅटी लिव्हर होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे.
फॅटी लिव्हरला आळा घालण्यासाठी आणि लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ते पाहूया.
१. वजन कमी करा
जास्त वजनामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवा.
२. व्यायाम करा
व्यायाम न केल्यास लिव्हरच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज न चुकता व्यायाम करा.
३. निरोगी आहार
निरोगी आहाराचे पालन करा. फायबर युक्त पदार्थ, फळे, भाज्या आणि तृणधान्ये यांचा आहारात समावेश करा. प्रोसेस्ड फूड, जंक फूड आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे शक्यतो टाळा.
४. मद्यपान
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी मद्यपान पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे.
टीप - वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास, स्वतःच्या मनाने उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्यानंतरच आजाराचे निदान करा.