
मुंबई : रताळ्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. मधुमेहाचे रुग्णही रताळे बिनधास्त खाऊ शकतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये रताळ्याचे फायदे सांगितले आहेत. रताळ्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणावर असते.
रताळ्यातील फायबर पचनाचा वेग कमी करते. विशेषतः सालीसकट रताळे खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढत नाही. तुम्हाला तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल, तरीही तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात रताळ्याचा समावेश करू शकता, असं अंजली मुखर्जी सांगतात.
रताळ्यामध्ये 'रेझिस्टंट स्टार्च' (resistant starch) असते. हे स्टार्च रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत करते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास रताळे हा एक अतिशय उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात, त्यामुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index - GI) कमी होतो. एखादा पदार्थ खाल्ल्यावर रक्तातील साखर (ग्लुकोज) किती वेगाने वाढते, हे मोजण्याचे प्रमाण म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स होय.
याशिवाय, रताळे शरीरातील एलडीएल (LDL) म्हणजेच 'बॅड कोलेस्ट्रॉल' कमी करायला मदत करते. रताळ्यामुळे फायब्रिनोजेनची पातळीही कमी होते. फायब्रिनोजेन कमी झाल्याने ते ॲस्पिरिनसारखे काम करते आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया रोखते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मधुमेहाच्या रुग्णांनी रताळे कसे खावे?
रताळे आरोग्यासाठी चांगले असले, तरी त्यातील कार्बोहायड्रेट्समुळे शुगर वाढू शकते. पण, रताळ्यातील भरपूर फायबरमुळे ही प्रक्रिया संथ होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रताळे नेहमी मर्यादित प्रमाणातच खाल्ले पाहिजेत. तसेच, शुगर वाढू नये म्हणून ते योग्य पद्धतीने शिजवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या गोष्टींची काळजी घ्या
आठवड्यातून दोनदा साधारण अर्धी वाटी उकडलेले किंवा भाजलेले रताळे खाणे फायदेशीर ठरते. रताळे नेहमी उकडून किंवा वाफवून खावेत. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रताळे तेलात तळल्यास त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढू शकतो, त्यामुळे तळलेले रताळे खाणे टाळा.
तुम्ही सॅलड किंवा सूपमध्येही रताळे घालू शकता. कार्बोहायड्रेट्ससोबत प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी नेहमीच फायदेशीर असते.