Bathroom Water Leakage : बाथरुममधून पाणी बाहेर येतंय? या सोप्या उपायांनी समस्येला करा बाय-बाय

Published : Sep 23, 2026, 03:10 PM IST
Bathroom Water Leakage : बाथरुममधून पाणी बाहेर येतंय? या सोप्या उपायांनी समस्येला करा बाय-बाय

सार

बाथरुम वापरताना अनेकदा दाराखालून पाणी बाहेर येतं. अनेकजण फक्त फरशी ओली होतेय म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. तुमच्याही घरात हीच अडचण असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे पाणी बाहेर येण्यापासून कसं रोखायचं, याचे सोपे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई : बाथरुममध्ये आंघोळ करताना किंवा बाथरुम वापरताना आतलं पाणी बाहेर येतं. दारातून बाहेर येणारं हे पाणी फक्त फरशी ओली करत नाही. रोज असं पाणी बाहेर येत राहिलं, तर दाराच्या आजूबाजूची फरशी, भिंती आणि रंगाचं मोठं नुकसान होतं. कुबट वास येण्याची समस्याही सुरू होते. बाथरुममधून बाहेर येणारं हे पाणी रोखण्यासाठी तुम्हाला फरशी किंवा भिंत फोडण्याची अजिबात गरज नाही.

बाथरुममधून येणारं पाणी कसं रोखायचं?

सगळ्यात आधी बाथरुममधून पाणी बाहेर का येतंय, याचं नेमकं कारण शोधून काढा. कारण समजलं, तर काही वेळा मोठा खर्च न करताही ही समस्या सोडवता येते. याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे बाथरुममधलं पाणी थेट ड्रेनेजमध्ये न जाणं. फरशीचा उतार ड्रेनेजच्या दिशेने बरोबर नसेल, तर पाणी एकाच जागी साचून राहतं आणि हळूहळू दाराच्या दिशेने वाहू लागतं.

याशिवाय दाराखाली योग्य वॉटर बॅरियर किंवा उंबरठा नसेल, तरीही पाणी सहज बाहेर येतं. टाईल्सच्या मधलं ग्राउटिंग खराब होणं, हेसुद्धा एक कारण असू शकतं. ग्राउटिंगमध्ये थोडी जरी गॅप पडली, तरी पाणी त्यात साचू शकतं. बाथरुमचं वॉटरप्रूफिंग नीट झालं नसेल, तर ही अडचण आणखी वाढते. पाईप किंवा इतर फिटिंग्जमध्ये लीकेज असेल, तरीही पाणी बाहेर येऊ शकतं. त्यामुळे फक्त दाराजवळ पाणी अडवून ही समस्या कायमची सुटणार नाही.

पाणी कुठून येतंय ते शोधा

पाणी अडवण्यापूर्वी ते नेमकं कुठून येतंय, याकडे लक्ष द्या. आंघोळ केल्यानंतर फक्त दाराजवळ पाणी साचून बाहेर येत असेल, तर फरशीचा उतार आणि दाराचं सीलिंग तपासून पाहा. पाणी जर भिंतीच्या कडेने किंवा टाईल्सच्या कडेने सतत येत असेल, तर ग्राउटिंग किंवा पाईपलाईनमध्ये बिघाड असू शकतो.

जर बाथरुमच्या खालच्या खोलीतील छतावर ओल, पाण्याचे डाग किंवा रंग उडालेला दिसत असेल, तर आतून लीकेज असण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी फक्त वरून सीलंट लावणं पुरेसं नसतं. तुम्हाला लीकेजचं मूळ कारण शोधावंच लागेल.

समस्येवर असे करा उपाय

पाईपमध्ये कोणतंही मोठं लीकेज नसेल आणि फक्त दाराकडे पाणी येण्याचीच अडचण असेल, तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

१. सगळ्यात आधी दाराचा खालचा भाग आणि फरशी जिथे जोडली जाते, ती जागा स्वच्छ करून घ्या. तिथे साचलेली घाण, जुनं सीलंट किंवा खराब झालेल्या ग्राउटमुळेही पाणी बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

२. स्वच्छता केल्यानंतर ती जागा पूर्णपणे कोरडी होऊ द्या.

३. त्यानंतर बाथरुमच्या दाराच्या खालच्या बाजूला वॉटरप्रूफ डोअर सील किंवा योग्य रबर सील तुम्ही लावू शकता. यामुळे पाणी थेट बाहेर येण्यापासून रोखता येतं.

४. दार आणि फरशी जोडल्या जाणाऱ्या ठिकाणीही तुम्ही वॉटरप्रूफ सीलंट वापरू शकता. पण सीलंट लावण्यापूर्वी ती जागा स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी असली पाहिजे.

५. दाराजवळून पाणी बाहेर येत असेल, तर छोटा वॉटर बॅरियर किंवा उंबरठा बसवणं फायद्याचं ठरतं. यामुळे पाणी बाथरुमच्या आतच राहतं आणि ड्रेनेजच्या दिशेने जायला मदत होते.

या गोष्टी लक्षात ठेवा

टाईल्सच्या मधलं ग्राउट तुटलं असेल किंवा छोट्या गॅप्स दिसत असतील, तर पाणी तिथून आत जाऊ शकतं. अशा वेळी खराब झालेलं ग्राउट काढून, त्या जागी नव्याने ग्राउटिंग करावं लागतं. यासाठी प्रत्येक वेळी संपूर्ण टाईल्स काढण्याची गरज नसते. अडचण फक्त एका छोट्या भागापुरती मर्यादित असेल, तर तेवढाच भाग दुरुस्त करून काम होऊ शकतं. पण टाईल्सच्या खाली सतत पाणी साचत असेल किंवा वॉटरप्रूफिंग खराब झालं असेल, तर तज्ज्ञांकडून बाथरुम तपासून घेणं केव्हाही चांगलं.

बाथरुम न वापरताही ओल दिसत असेल, भिंतीवर सतत ओलसरपणा जाणवत असेल, खालच्या खोलीच्या छतावर पाण्याचे डाग दिसत असतील किंवा पाईपमधून सतत पाणी गळत असेल, तर याला फक्त दाराची समस्या समजू नका. अशा वेळी पाणी गळतीचं मूळ कारण शोधणं खूप महत्त्वाचं आहे. पाईपलाईनमध्ये बिघाड असेल, तर तो भाग दुरुस्त करावा लागेल. वॉटरप्रूफिंगमध्ये गंभीर अडचण असेल, तर तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं ठरू शकतं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Numerology : या तारखांना जन्मलेले लोक तरुण वयातच होतात करोडपती
Chanakya Niti : पाहुणे म्हणून नातेवाईकांकडे जाताय? चाणक्यांनी सांगितलेल्या या 8 चुका टाळा