
नवी मुंबईतील वाशी येथे मनसेच्या वाहतूकदार मेळाव्यात राज ठाकरे यांनी ई-चलान, वाहतूक कोंडी आणि नियोजनाच्या अभावावर भाष्य केले. ई-चलानला विरोध नसून ते लावण्याच्या पद्धतीची तपासणी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. वाढती वाहनसंख्या, नियोजनाशिवाय उभारले जाणारे पूल आणि वाहतूक व्यवस्थेवरील ताण याबाबत चिंता व्यक्त केली. मुंबईची लोकल सेवा कोलमडल्यास रस्त्यांवरील परिस्थिती काय होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वतःच्या चालकांनाही सिग्नल न मोडण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. केवळ जीडीपी वाढून उपयोग नाही, तर वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात कधी येते, याची वाट पाहत असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.