पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण?, स्वत:च केलं जाहीर; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमधील महाराजगंज येथील एका सभेला संबोधित करताना देशातील जनताच आपली उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : May 21, 2024 11:47 AM IST / Updated: May 21 2024, 07:57 PM IST

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना मोठी भविष्यवाणी केली होती. केजरीवाल म्हणाले होते, ‘लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शाह पंतप्रधान होतील’. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. आता यावर खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमधील महाराजगंज येथील एका सभेला संबोधित करताना देशातील जनताच आपली उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“माझा उत्तराधिकारी कोणीही नाही. या देशातील जनताच माझी उत्तराधिकारी आहे”. बिहारच्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, “काँग्रेस पक्ष आज तुकडे तुकडे टोळीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. बिहारमधील जंगलराजसाठी त्यांची आघाडी जबाबदार आहे. येथील काही लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. देशातील जनतेने हे सर्व पाहिले आहे. या आघाडीत तीन गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे टोकाचा धर्मवाद, जातीवाद आणि कुटुंबवाद. मात्र, या सर्वांना ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मोठा धक्का बसेल”, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, “बिहारमधील आघाडीच्या नेत्यांना राज्यातील सन्मानाची पर्वा नाही. पंजाबमधील काँग्रेस नेते बिहारच्या लोकांबद्दल द्वेषपूर्ण बोलतात. पण बिहारमध्ये आरजेडी काँग्रेससोबत युती करत आहे. पहिल्यांदा त्यांनी येथून उद्योग आणि व्यवसायांचे स्थलांतर केले. आता ते बिहारच्या कष्टकरी सहकाऱ्यांचा अपमान करण्यात व्यस्त आहेत”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत 25 हजार महिलांशी संवाद साधणार, रॅलीतील महिलांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आयोजित केला कार्यक्रम

 

Share this article