
नोएडा: भारत 24 वृत्तवाहिनीची अँकर शाझिया निसार आणि 'अमर उजाला'च्या डिजिटल विंगचे अँकर आदर्श झा यांना खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि धमकी देणे या आरोपांवरून नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवर तीन एफआयआर दाखल करण्यात आले असून, त्यात गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
या दोघांवर भारत 24 चे मॅनेजिंग डायरेक्टर जगदीश चंद्र, कन्सल्टिंग एडिटर अनीता हाडा आणि एचआर प्रमुख अनु श्रीधर यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपींनी तब्बल ₹65 कोटींची खंडणी मागितली आणि खोट्या बलात्काराच्या केसेस दाखल करण्याची धमकी दिली.
पोलिसांनी शाझिया निसारच्या घरावर छापा टाकला असता ₹34.5 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. दोघा आरोपींना गौतम बुद्ध नगर न्यायालयात हजर करण्यात आले असून, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, आरोपींनी सुरुवातीला ₹५ कोटींची मागणी केली होती, जी नंतर वाढवून ₹६५ कोटी करण्यात आली. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपिंग्समध्ये धमक्यांचे पुरावे मिळाले असून, हे साक्षीपुरावे म्हणून तपासात वापरण्यात येणार आहेत.
नोएडा सेक्टर-५८ पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाला वेग दिला आहे. पोलिसांना असा संशय आहे की, ही कारवाई फक्त एकट्या-दुकेट्यांची नसून, मोठ्या ब्लॅकमेलिंग सिंडिकेटचा भाग असू शकते. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशयही वर्तवण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण मीडिया क्षेत्रात खळबळ उडाली असून, पत्रकारितेतील नैतिकता, जबाबदारी आणि सत्तेचा गैरवापर यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
NewsLaundry या पोर्टलशी बोलताना जगदीश चंद्र यांनी सांगितलं, "कायदा आपला मार्ग घेत आहे… ती केवळ माझ्यावर नाही, तर अनेक वरिष्ठ सहकाऱ्यांवर दबाव आणत होती. संपादक सय्यद उमर, अनीता हाडा, एचआर प्रमुख अनु आणि डेस्क व असाइनमेंट टीममधील अनेक लोक तिच्या वागणुकीने त्रस्त होते."
शाझिया निसारला अटक होण्याच्या काही तास आधीच भारत 24 कडून नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले होते.
शाझिया निसार यापूर्वी रिपब्लिक भारतमध्ये काम करत होती आणि तिने रशिया-युक्रेन युद्धावेळी केलं गेलेलं थेट रिपोर्टिंग चर्चेचा विषय ठरलं होतं. तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.