
प्रयागराजमध्ये ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, त्यांचे शिष्य मुकुंदानंद ब्रह्मचारी आणि इतर काही जणांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत एका विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर झूंसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला. शनिवारी रात्री उशिरा, साधारण ११:३० वाजता, कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चं कलम ३५१(३) आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO), २०१२ मधील कलम ३, ४(२), ६, १६, १७ आणि ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ जानेवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या घटना घडल्याचा आरोप आहे. तक्रारीमध्ये अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
आशुतोष ब्रह्मचारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश (पॉक्सो) विनोद कुमार चौरसिया यांनी हा आदेश दिला. तक्रार, दोन पीडितांचे जबाब, स्वतंत्र साक्षीदारांची साक्ष आणि प्रयागराजच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सादर केलेला चौकशी अहवाल या सगळ्या गोष्टींचा न्यायालयाने विचार केला. रेकॉर्डवरील माहितीनुसार दखलपात्र आणि शिक्षापात्र गुन्हा घडल्याचं दिसून येतंय, असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने झूंसी पोलीस स्टेशनच्या एसएचओला तातडीने एफआयआर दाखल करून कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणाच्या तपासात इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि इतर फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याची गरज भासू शकते, असंही न्यायालयाने नमूद केलं. असे पुरावे मिळाल्यास, ते योग्य फॉरेन्सिक प्रक्रियेद्वारे तपासले आणि पडताळले जावेत, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी शनिवारी आपल्यावरील पॉक्सो कायद्यांतर्गत लावलेले आरोप 'बनावट' असल्याचं म्हणत फेटाळून लावले. आपल्या कायदेशीर टीमने शनिवारीच कोर्टाला या भूमिकेबद्दल माहिती दिली होती, असंही त्यांनी नमूद केलं.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना शंकराचार्यांनी आरोप केला की, तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी याचा इतरांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा इतिहास आहे आणि तो उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कांधला पोलीस स्टेशनमध्ये हिस्ट्री-शीटर म्हणून नोंदलेला आहे.
आपल्यावरील आरोपांवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "सनातन धर्माला बाहेरच्या कुणापासून धोका नाही, तर आतलेच काही लोक हिंदू धर्माला आणि शंकराचार्य नावाच्या संस्थेला संपवू पाहत आहेत." ते पुढे म्हणाले, “कोर्टाची स्वतःची एक प्रक्रिया असते. कोर्टाने तक्रार नोंदवून घेतली आहे आणि आता ते तपास करतील. आम्ही कोर्टाला सांगितलं आहे की हे प्रकरण बनावट आहे. आशुतोष नावाचा जो तक्रारदार आहे, तो उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कांधला पोलीस स्टेशनमध्ये हिस्ट्री-शीटर म्हणून नोंदलेला आहे. अनेक लोक स्वतः पीडित आहेत आणि सांगतात की त्याने (आशुतोष पांडे) त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आमच्यावर आरोप एका अशा व्यक्तीच्या शिष्याने लावले आहेत, जो स्वतःला जगद्गुरू म्हणवतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की सनातन धर्माला बाहेरच्या कुणापासून धोका नाही, तर आतलेच काही लोक हिंदू धर्माला आणि शंकराचार्य नावाच्या संस्थेला संपवू पाहत आहेत.”