
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर लॉरेन्स बिश्नोई टोळीला संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप केला. बिश्नोई साबरमती कारागृहात असूनही मुंबईसह इतर राज्यांच्या पोलिसांना त्याची कोठडी का दिली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बॉलिवूडमधील हल्ल्यांमागे अमित शहा असल्याचा दावा करत भविष्यात राजकीय नेत्यांवरही हल्ले होण्याची भीती व्यक्त केली. एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची बिश्नोई टोळीशी तुलना करत महाराष्ट्रातील सत्ताबदल धमक्यांच्या जोरावर झाल्याचा आरोप केला. शिंदेंच्या मार्गात येणाऱ्यांना संपवण्याच्या कथित वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष धमकी दिली जात असल्याचा दावा करत त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी राऊतांनी केली.