
RSS Chief Mohan Bhagwat Says India is a Hindu Nation : भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि त्याला घटनात्मक मान्यतेची गरज नाही, असे RSS प्रमुख मोहन भागवत म्हणाले. कोलकात्यात RSS च्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जोपर्यंत भारतात राहणारे लोक भारताला मातृभूमी मानतात, भारतीय संस्कृतीचा आदर करतात आणि हिंदुस्थानच्या पूर्वजांच्या गौरवावर विश्वास ठेवतात, तोपर्यंत भारत हिंदू राष्ट्र राहील, असेही ते म्हणाले.
जन्मावर आधारित जातीय व्यवस्था हे हिंदुत्वाचे लक्षण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'सूर्य पूर्वेला उगवतो, हे कधीपासून घडत आहे हे आपल्याला माहीत नाही. त्याला घटनात्मक मान्यतेची गरज आहे का? हिंदुस्थानचेही तसेच आहे. हे एक हिंदू राष्ट्र आहे. संसदेने कधी घटनादुरुस्ती करून 'हिंदू राष्ट्र' हा शब्द जोडण्याचा निर्णय घेतला किंवा नाही घेतला, तरी RSS ला त्याची चिंता नाही. कारण भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे एक वास्तव आहे.'
'RSS मुस्लिमविरोधी आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी लोकांनी संघटनेची कार्यालये आणि शाखांना भेट द्यावी. RSS चे कार्य पारदर्शक आहे. हिंदूंच्या संरक्षणासाठी उभी असलेली संघटना मुस्लिमविरोधी नाही, हे आता अनेकजण मान्य करत आहेत. RSS कट्टर राष्ट्रवादी आहे'. हिंदू समाजाला संघटित करणे हे देशाच्या प्रगतीसाठी आहे, सत्तेसाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' हे शब्द घटनेच्या प्रस्तावनेत जोडण्यात आले होते, या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत मोहन भागवत बोलत होते.