PM मोदी रशियाच्या विजय दिन सोहळ्याला जाणार नाहीत, हे आहे कारण

Published : Apr 30, 2025, 04:40 PM IST
PM मोदी रशियाच्या विजय दिन सोहळ्याला जाणार नाहीत, हे आहे कारण

सार

विजय दिन सोहळा: पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या विजय दिन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आहे. मात्र, अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विजय दिन सोहळा: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ९ मे रोजी विजय दिन सोहळा आयोजित केला जाणार आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक जागतिक नेत्यांना आमंत्रित केले आहे. मात्र पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

क्रेमलिनच्या प्रवक्त्याने बुधवारी (दि.३०) वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, नरेंद्र मोदी विजय दिन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. रशियन अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयामागचे कारण सांगितले नसले तरी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढला आहे. सध्याची परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदींनी रशियाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाला जातील

रशिया ९ मे रोजी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर मिळवलेल्या विजयाचा सोहळा साजरा करतो. यावर्षी या सोहळ्याचा ८० वा स्मरणदिवस आहे. या निमित्ताने भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिनपिंग रशियाला जाणार आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले होते की, पंतप्रधान मोदींना ९ मे रोजी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून निमंत्रण मिळाले आहे. भारताच्या सहभागाबाबत योग्य वेळी घोषणा केली जाईल. रशियन सरकारी वृत्तसंस्था TASS ने भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले होते की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विजय दिन परेडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात.

पहलगाम दहशतवादी हल्ला

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. त्यावेळी नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. हल्ला झाल्यानंतर ते दौरा रद्द करुन भारतात परतले होते.

PREV

Recommended Stories

NEET UG 2026 : अंतिम अभ्यासक्रम वेबसाईटवर जाहीर, NTA ने दिली माहिती
Face authentication: UPSC परीक्षेत आता डमी उमेदवाराची केवळ 10 सेकंदात ओळख पटणार