PM Modi Diwali : बस्तरमध्ये जवानांसोबत पंतप्रधान मोदींची दिवाळी, सोनिया गांधींवर निशाणा

Published : Nov 08, 2026, 02:39 PM IST
MODI AT BASTHAR

सार

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी ते छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरक्षा दलातील जवानांसोबत होते. नक्षलवाद संपल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याचं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली: नक्षलग्रस्त भागात सीआरपीएफचे जवान शहीद झाले तेव्हा राजवाड्यात बसलेल्या कोणाच्याही डोळ्यात पाणी आलं नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बस्तर आणि दंतेवाडामध्ये जवानांवर दोनदा हल्ला झाल्याचंही मोदींनी सांगितलं. बाबरी मशिदीचा ढाचा पडल्याचं टीव्हीवर पाहून रडू कोसळल्याचा उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात केला होता. याच संदर्भाने मोदींनी त्यांना टोला लगावला.

नक्षलवाद संपल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याचं मोदी म्हणाले. बस्तर परिसरातील सर्व जिल्हे आता नक्षलमुक्त झाले आहेत. याचं सर्व श्रेय सुरक्षा दलांना जातं. १४० कोटी जनतेच्या वतीने मी तुमच्या समर्पणाला सलाम करतो, असं मोदी म्हणाले.

अंतर्गत सुरक्षा मजबूत

देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत असेल तर बाहेरचे शत्रू काहीही करू शकत नाहीत. पण तसं नसेल तर बाहेरच्या शत्रूंना संधी मिळते, असं मोदी म्हणाले. देशाची एकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीआरपीएफ, कोब्रा, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि आयआरबी सर्वांनी एकत्र काम केलं. बस्तर फायटर्स, स्पेशल फोर्स कमांडोज आणि महिला सुरक्षा रक्षकांनीही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्वी २० राज्यांमधील २३० जिल्हे नक्षलग्रस्त होते. रात्री घराबाहेर पडण्याची भीती वाटायची, मतदानाचा हक्कही हिरावला गेला होता.

बिहार, यूपी, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांचीही हीच अवस्था होती. वर्षाला २००० पर्यंत हिंसक घटना घडायच्या. २०१० मध्ये दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांची हत्या केली होती. २०१३ पर्यंतची आकडेवारी पाहिली तर, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांपेक्षा जवानांची संख्या अधिक होती. ही परिस्थिती अशीच राहील असं देशाला वाटत होतं. पण आता चित्र बदललं आहे.

गेल्या वर्षभरात एकाही सीआरपीएफ जवानाला प्राण गमवावे लागले नाहीत. आधीच्या सरकारांनी जवानांचे हात बांधून ठेवले होते. आता सुरक्षा दलांना कारवाईचं स्वातंत्र्य दिलं आहे. आधी नक्षलवाद्यांना सरकारी यंत्रणांमधून मदत मिळायची, ती आता बंद झाली आहे. नक्षलवाद संपला असला तरी धोका टळलेला नाही, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. 'दिमागी नक्षल' (बुद्धिजीवी नक्षलवादी) आजही अनेक ठिकाणी सक्रिय आहेत. ते आजही संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात काम करत आहेत. अनेक संघटनांमध्ये त्यांनी शिरकाव केल्याची टीकाही पंतप्रधानांनी केली.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Climate Cost : हवामान बदलामुळे भारताला द्यावी लागणार मोठी किंमत
Manoj Jarange Pati | lजखमांच्या प्रकरणी जरांगेंची CID तपासाची मागणी