
दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, २१ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. याबाबत अधिकृत माहिती जरी उघड करण्यात आलेली नसली, तरी पंतप्रधान कोणत्या मुद्द्यांवर बोलणार, यावर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू आहे.
२२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. याचवेळी नवीन जीएसटी दरही लागू होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची मागणी होती. अलीकडे जीएसटी परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, दोन कर संरचना रद्द करून आता केवळ दोनच कर गट ठेवण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे वाढती महागाई नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा आहे. तसेच, सामान्य जनतेला या कर कपातीचा थेट फायदा मिळावा, यावर केंद्र सरकारचा विशेष भर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आजच्या भाषणात या विषयावर सविस्तर भाष्य करू शकतात.
अमेरिकेने अलीकडेच ५०% टॅरिफ लावल्यामुळे भारत-अमेरिका व्यापारावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत, मोदी यांनी वारंवार दिलेला ‘स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन’ देण्याचा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे मांडला जाऊ शकतो.
आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्द्यांना स्पर्श करतील, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. कर प्रणालीत सुधारणा, महागाईवरील उपाय, स्वदेशी मोहिमेला चालना, आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून येणाऱ्या घोषणा – या सर्व गोष्टींचा समावेश त्यांच्या भाषणात होऊ शकतो.