पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, 306 प्रवाशांचा जीव टांगणीला

विस्‍ताराच्या विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडल्याने मोठी खळबळ उडाली.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 2, 2024 11:33 AM IST

Paris-Mumbai Flight Bomb Threat : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून मुंबईत येणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील पत्र मिळाल्यामुळे क्रु-मेंबर्स आणि 306 प्रवाशांमध्ये प्रचंड खबराट पसरली. यानंतर तात्काळ विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सुदैवाने विमानातील सर्वजण सुरक्षित आहेत. यापूर्वी चेन्नईहून मुंबई आणि दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानांमध्येही बॉम्ब असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, तपासात काहीच सापडले नाही.

पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विस्ताराची फ्लाइट क्रमांक UK 024 मुंबईला येत होती. यावेळी विमानात बॉम्ब असल्याचे पत्र क्रु-मेंबर्सच्या हाती लागली. याबाबत तात्काळ मुंबई विमानतळाला माहिती देण्यात आली. यानंतर रविवारी सकाळी 10:19 वाजता मुंबई विमानतळावर विमानाची ईमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. लँडिंगनंतर विमानातील 294 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढले.

इंडिगो विमान उडवण्याची धमकी

यापूर्वी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. फ्लाइट क्रू मेंबरला एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. बॉम्बची धमकी मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आधी विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली, पण त्यात काहीच संशयास्पद आढळले नाही.

 

Share this article