
नवी दिल्ली - पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवानला अटक केल्यानंतर काही दिवसांतच भारताला एक मोठे यश मिळाले आहे. शनिवारी (३ मे) बीएसएफने राजस्थान सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला अटक केली आहे. ही कारवाई भारतीय जवानला परत आणण्यात महत्त्वाची ठरेल. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) २६ जणांच्या मृत्युनंतर बीएसएफचा जवान वाट विसरुन चुकून पाकिस्तानी क्षेत्रात पोहोचला होता.
बीएसएफच्या सूत्रांनुसार, राजस्थान सीमेवर हा रेंजर संशयास्पद हालचाली करताना सापडला. सुरुवातीच्या चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. ही अटक भारत-पाकिस्तान सीमा क्षेत्रात राजस्थानमध्ये झाली आहे.
२३ एप्रिल रोजी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ (Purnam Kumar Shaw) याला पाकिस्तान रेंजर्सने पंजाब सीमेवरून अटक केली होती. भारताने अनेक वेळा मागणी केली असली तरी अजूनही पाकिस्तानने जवान सोडलेला नाही. पूर्णम कुमार हा बीएसएफच्या १८२व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे. ही घटना पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये (Ferozepur Border) घडली, जिथे जवान पूर्णम कुमार शेतकऱ्यांना शेतात सुरक्षितपणे पोहोचवण्याचे काम करत होता. त्याचवेळी तो वाट चुकला आणि अनवधानाने पाकिस्तानच्या सीमेत शिरला. वृत्तानुसार, तो सीमा ओलांडून एका झाडाच्या सावलीत विश्रांती घेत होता तेव्हा पाकिस्तान रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले.
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना ठार मारले. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. सिंधू नदीचे पाणी थांबवण्याबरोबरच आयात-निर्यातवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.