
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानने भारतासोबत युद्धविराम करार केल्यानंतर काही तासांतच त्याचे घोर उल्लंघन सुरू केले आहे. यावरून भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तानने परिस्थिती योग्य प्रकारे समजून घ्यावी. सैन्यांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
विक्रम मिस्री म्हणाले, "भारत आणि पाकिस्तानच्या DGMOs मध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाई थांबवण्याचा करार शनिवारी संध्याकाळी झाला होता. गेल्या काही तासांपासून या कराराचे पाकिस्तानकडून घोर उल्लंघन होत आहे. भारतीय सेना प्रत्युत्तर देत आहे. या सीमा अतिक्रमणाला तोंड देत आहे. हे अतिक्रमण अत्यंत निंदनीय आहे. पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे. आमचे मत आहे की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्य प्रकारे समजून घ्यावी आणि हे अतिक्रमण थांबवण्यासाठी तातडीने योग्य ती कारवाई करावी."
ते म्हणाले, "सशस्त्र दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय सीमा तसेच नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या कोणत्याही पुनरावृत्तीच्या घटनेला कडकपणे तोंड देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."