
नवी दिल्ली: २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता महिना उलटला आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. देश अजूनही या घटनेच्या हादऱ्यातून सावरतो आहे. मात्र, या काळात दहशतवाद्यांचा माग काढण्यात यंत्रणांना अपयश आलं असून, अद्याप चारही हल्लेखोर मोकाट फिरत आहेत.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत सरकारला अडचणीत आणलं आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत सरकारच्या ‘जल्लोषा’वर ताशेरे ओढले आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणतात, “मोदी, पहलगाम हल्ल्यास जबाबदार दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. घटनेला महिना झाला. मग जल्लोष कसला करताय? त्या हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आप्त गमावले, त्यांच्या पत्नी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.” त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत विचारलं आहे की, जेव्हा मूळ आरोपी मोकाट आहेत, तेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा गवगवा करणं कोणत्या नैतिकतेत बसतं?
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे सोपवली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक काश्मिरी दहशतवादी सामील होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे की, हे दहशतवादी अजूनही काश्मीरच्या पर्वतीय भागात लपलेले आहेत. परंतु, अद्याप त्यांच्या अटकेसंदर्भात कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.
या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर व वायूदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारल्याचा दावा करण्यात आला. भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन हल्ले व क्षेपणास्त्र डागले, ज्याला भारतानेही तडाखेबाज उत्तर दिलं. काही काळासाठी युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती, जी नंतर आंतरराष्ट्रीय चर्चांमुळे शांत झाली. परंतु जिथून या सगळ्याची सुरूवात झाली त्या पहलगाम हल्ल्याचे मूळ आरोपी अजूनही मोकाट आहेत, ही बाब सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी अजूनही कोणताही स्पष्ट न्यायप्रक्रियेचा मार्ग दिसत नाही. एकीकडे सरकार यशाची गाणी गातं, तर दुसरीकडे हल्ल्याचे बळी न्यायासाठी झगडत आहेत.
हल्ल्यानंतरची हालचाल महत्त्वाची असते, पण त्याहून अधिक महत्त्वाचं असतं ते परिणाम. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल सरकारला धक्का देणारा आहे, पण तो देशवासीयांच्या मनातीलच प्रश्न आहे. “दहशतवादी अजूनही मोकाट असतील, तर मग जल्लोष कसला?”