
नवी दिल्ली: देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निर्णायक लढत उद्या (9 सप्टेंबर) पार पडणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संसद भवनात मतदान होणार असून, संख्याबळ पाहता एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. INDIA आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली असली, तरी त्यांच्यासमोर आव्हान मोठं आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले, ते तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने. ओडिशाचे नवीन पटनायक (BJD), तेलंगणाचे चंद्रशेखर राव (BRS) आणि आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी (YSRCP) यांनी एनडीएला थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय अधिक सोपा झाला आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांतील एकूण 781 खासदारांपैकी सध्या 770 खासदार मतदान करणार असल्याचे मानले जात आहे. यामुळे विजयासाठी 386 मतांची गरज आहे.
एनडीएकडे आधीच 425 खासदार
YSRCPचे 11 खासदार वेगळेच समर्थन देत आहेत
म्हणजेच एकूण पाठिंबा = 436 खासदार
या निवडणुकीत कोणताही व्हिप लागू नसतो. म्हणजे खासदार आपल्या विवेकानुसार मतदान करतात. त्यामुळे क्रॉस व्होटिंगची शक्यता कायम असते. मात्र, यावेळी संख्याबळ इतकं स्पष्ट आहे की त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.
लोकसभेतील 7 अपक्ष खासदार, शिरोमणी अकाली दल, मिझोरममधील ZPM आणि आपच्या स्वाती मालिवाल यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र या सर्वांचं एकत्रित संख्याबळ फारसं निर्णायक ठरणार नाही.
INDIA आघाडीकडे 324 खासदार असून, विजयासाठी आवश्यक 386 मतांपासून ते 62 मतांनी दूर आहेत. अपक्ष, अकाली दल, ZPM, मालिवाल यांची मतं मिळाली तरीही सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी आकडा अपुरा ठरण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांची संपूर्ण मदार क्रॉस व्होटिंगवर आहे, आणि तीही खूपच अनिश्चित.
भाजपच्या गोटात विजयाची शक्यता बळकट झाल्याने आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे, INDIA आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका या निकालावर निर्णायक ठरणार आहे.