
सहसा प्रवासाला गेल्यावर किंवा शहरांमध्ये एकट्या महिला चालत असताना चोर येऊन बॅग हिसकावून नेण्याचे प्रकार आपण पाहिले असतील. पण, इथे एक कुटुंब प्रवासाला गेले असताना एका महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग माकडाने हिसकावून नेली आहे. आता पोलिस आणि लोक बागेत माकडाचा शोध घेत आहेत.
प्रवासातून परतल्यावर घरातले सर्व सामान चोरांनी लंपास केल्याच्या बातम्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. अनेकांना आयुष्यात असा अनुभव आला असेल. चोऱ्या वाढत असल्याने, कुठेतरी जाताना आपली सर्व कमाई सोबत घेऊन जायला काही जण तयार असतात. पण, अश्या वेळी सोबत नेलेल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत ते विचार करत नाहीत. उलट, ते आपल्यासोबत असल्याने सुरक्षित असतील असा अतिआत्मविश्वास बाळगतात.
उत्तर प्रदेशातील वृंदावनला भेट देणाऱ्या अलिगढच्या रहिवासी अभिषेक अग्रवाल यांना असाच अनुभव आला. ते वृंदावनातील ठाकूर बांके बिहारी मंदिरासमोर प्रार्थना करत असताना, त्यांच्या पत्नीच्या हातातील २० लाख रुपये किमतीची सोन्याची दागिने असलेली बॅग एका माकडाने हिसकावून नेली. क्षणार्धात, माकड बॅग घेऊन इमारतींमध्ये अदृश्य झाले. नंतर अभिषेक यांच्या पत्नीने ओरड केली आणि मंदिरातील कर्मचारी आणि भाविकांनी बॅगसाठी माकडाचा शोध घेतला. पण माकड सापडले नाही. शेवटी अभिषेक यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.
घटनेची माहिती मिळताच सदरचे सर्कल अधिकारी संदीप कुमार यांनी पोलिस आणि स्थानिकांचे पथक तयार करून बॅगचा शोध घ्यायला पाठवले. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. गुंतागुंतीच्या आणि अरुंद रस्त्यांमधील इमारतींमध्ये सतत शोध घेतल्यानंतर, त्यांना परिसरातील एका उंच झाडाच्या फांदीवर बॅग लटकलेली दिसली. तोपर्यंत शोध आठ तासांपेक्षा जास्त काळ चालला होता. सापडलेली बॅग तपासली असता, काहीही हरवले नाही हे लक्षात आल्यावर अभिषेक यांनी वृंदावन पोलिसांचे आभार मानले.