Mobile Tower: बिहारच्या बक्सर जिल्ह्यात चोरांनी एक अजबच चोरी केली आहे. त्यांनी चक्क 132 फूट उंच मोबाईल टॉवरच चोरून नेला. या टॉवरसोबत 15 KVA क्षमतेचा जनरेटरही गायब झाल्याने पोलीस आणि स्थानिक हैराण झाले आहेत.
चोर सोनं-चांदी, पैसे चोरतात हे आपण ऐकलंय. पण बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डुमराव शहरात चोरांनी कमालच केली. त्यांनी चक्क 132 फूट उंच मोबाईल टॉवर आणि त्यासोबतचा 15 KVA क्षमतेचा जनरेटर सेटच पळवला. ही घटना कळताच पोलीस आणि स्थानिक चक्रावून गेले आहेत.
24
असा गायब झाला भलामोठा टॉवर
GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कर्मचारी 10 जून रोजी टॉवरच्या दुरुस्तीसाठी घटनास्थळी पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला, कारण 132 फुटी टॉवर जागेवर नव्हताच. हा टॉवर सुमारे 10 ते 15 वर्षांपूर्वी बसवला होता. जमिनीचा करार संपल्याने तो काही वर्षांपासून बंद होता. याच संधीचा फायदा घेऊन चोरांनी मशिनरी वापरून टॉवरचे तुकडे केले आणि चोरून नेले असावा, असा पोलिसांना संशय आहे.
34
जमीन मालक आणि स्थानिक काय म्हणाले?
ज्या जागेवर टॉवर होता, तिचे मालक हरिनाथ यादव यांनी सांगितले की, 2010 मध्ये कंपनीसोबत 12 वर्षांचा करार झाला होता. 2022 मध्ये हा करार संपला, त्यानंतर कंपनीने भाडे दिले नाही. त्यांनी कंपनीला चार वेळा नोटीस पाठवली, पण काहीच उत्तर आले नाही. आता तर टॉवरच गायब झाला आहे. तर, गेल्या 15-20 दिवसांपासून टॉवर दिसत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. कंपनीनेच तो काढला असेल असं त्यांना वाटलं होतं.
या अजब चोरीप्रकरणी GTL इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रतिनिधीने डुमराव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बक्सरचे एसपी शुभम आर्या यांनी सांगितले की, गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चोरलेलं साहित्य भंगारात विकलं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस आता जमीन मालक, कंपनीचे अधिकारी आणि स्थानिकांची चौकशी करत आहेत. याआधीही बिहारमध्ये 60 फूट लांबीचा पूल आणि 2 किलोमीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.