'भारतातील सर्वात महागड्या गृहप्रकल्पांपैकी एकातील एक मिनीमलिस्ट घर!' अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
भारतातील सर्वात महागड्या निवासी सोसायटींपैकी एक असलेल्या गुरुग्राममधील डीएलएफ कॅमेलियाज्च्या आत असलेल्या एका 'मिनीमलिस्ट' घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर स्थित असलेल्या कॅमेलियाज् मध्ये १०० कोटींहून अधिक रुपयांना अपार्टमेंट विकली जातात. या आतल्या एका घराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुरुग्राममधील एका आर्किटेक्टच्या मालकीचे हे आलिशान अपार्टमेंट दाखवणारा व्हिडिओ प्रियम सारस्वत या कंटेंट क्रिएटरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बाल्कनी, बार एरिया, वर्कस्पेस, खाजगी जागा अशा सुविधा या 'मिनीमलिस्ट' म्हणून वर्णन केलेल्या अपार्टमेंटमध्ये आहेत.
आर्किटेक्ट असलेल्या घरमालकिणीच्या म्हणण्यानुसार, तिचे व्यावसायिक पती आणि सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असलेला मुलगा हे या घरातील रहिवासी आहेत. घरातील आलिशान इंटिरियरला त्यांनी 'मिनीमलिस्टिक' असे संबोधले आहे. 'भारतातील सर्वात महागड्या गृहप्रकल्पांपैकी एकातील एक मिनीमलिस्ट घर!' अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये, आर्किटेक्टने स्पष्ट केले की अपार्टमेंटमध्ये दोन भाग आहेत. पाहुण्यांसाठी आणि मनोरंजनासाठी एक सार्वजनिक भाग आणि बेडरूमसह एक खाजगी भाग. अपार्टमेंटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ७२ फूटांचा काचेचा बाल्कनी, ज्यामध्ये सुमारे ५० लोक बसू शकतात. याशिवाय, मास्टर बेडरूमसह दोन बेडरूम, एक बार एरिया आणि एक वर्कस्पेस आहे.
व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासांतच अनेक लोकांनी तो पाहिला. आतापर्यंत २.४ दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिलेल्या काहींनी अपार्टमेंटला सुंदर म्हटले, तर काहींना 'हे खरंच साधे घर आहे का?' असा प्रश्न पडला. '१०० कोटींचे साधे घर' अशी काहींनी उपरोधिक टिप्पणी केली.