
कोल्हापुरात मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ₹500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक, सायबर आणि SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांचा आवाज नसून केवळ नावाचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. श्वेता शालिनी, अतुल भातखळकर आणि युट्युबर कुलकर्णी यांच्या कथित सहभागाची पडताळणी व्हावी, तसेच क्लिप जरांगेंपर्यंत कोणी पोहोचवली, याचा तपास व्हावा, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलिन करण्याचा किंवा शिवसेना आणि मराठा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. भाजप-शिवसेना युती नैसर्गिक असल्याचे सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर थेट आरोप केलेला नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.