
Major Flight Disruptions flights delayed at Delhi Airport : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान उड्डाण सेवेवर परिणाम झाला. यामुळे अनेक उड्डाणे एका तासापेक्षा जास्त उशिराने झाली आणि १०० हून अधिक विमानांवर याचा परिणाम झाला.
तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगोने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दिल्लीच्या IGI विमानतळावरून दररोज १,५०० हून अधिक उड्डाणे होतात. तेथे उपस्थित प्रवाशांना संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तांत्रिक टीम एटीसी सिस्टीममधील बिघाड दुरुस्त करत असल्याचे लोकांना सांगण्यात आले. लवकरच विमानसेवा सामान्य होईल, असे एअर इंडियाने सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, त्याचे विमान अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ धावपट्टीवर थांबले होते. एअर ट्रॅफिक कंट्रोल प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे उशीर झाल्याचे विमान कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या बिघाडामुळे काही काळ विमानसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे बोर्डिंग गेटवर प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र, अद्याप विमान कंपन्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर बुधवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुमारे दीड तास चेक-इनमध्ये अडचणींचा सामना करावा लागला होता. एअर इंडियाची चेक-इन प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली होती.