
प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पण तामिळनाडूच्या मदुराईमध्ये घडलेली ही ताजी घटना पाहून माणुसकीलाही लाज वाटेल. क्षुल्लक कारणावरून एका महिलेने इतकं अमानुष कृत्य केलं की, तिने रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लांना भिंतीवर आपटून ठार मारलं. ही संपूर्ण भयंकर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
रिपोर्टनुसार, मदुराईजवळच्या एका परिसरात दोन शेजाऱ्यांमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. या भांडणादरम्यान, समोरच्या घरातील लोकांनी या महिलेच्या मुलावर दगड फेकल्याचा आरोप आहे. याचाच राग मनात धरून त्या महिलेने आपला सगळा संताप घरासमोर खेळणाऱ्या मुक्या प्राण्यांवर काढला. तिने रस्त्यावर फिरणाऱ्या लहान पिल्लांना एकामागून एक उचललं आणि निर्दयीपणे भिंतीवर आपटलं. या क्रूर कृत्यामुळे दोन पिल्लांचा जागीच मृत्यू झाला.
महिलेचं हे राक्षसी कृत्य तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. व्हिडिओमध्ये ती महिला कुत्र्याच्या पिल्लांना आधी पायाने लाथाडताना आणि नंतर त्यांना भिंतीवर आपटताना स्पष्ट दिसत आहे. हे पाहून प्राणीप्रेमी आणि सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'कुत्र्याचं जिणं म्हणजे हेच का?' असा सवाल लोक विचारत आहेत.
साधारणपणे महिलांना माया, करुणा आणि वात्सल्याचं प्रतीक मानलं जातं. पण अशा घटना घडल्यावर त्या विश्वासाला तडा जातो. रागाच्या भरात माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, याचंच हे उदाहरण आहे. स्वतःचं रक्षण करू न शकणाऱ्या प्राण्यांवर इतका अत्याचार करण्याचं धाडस कुणी कसं करू शकतं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
या घटनेनंतर प्राणी कल्याण मंडळ आणि स्थानिक लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी महिला मीनाक्षी मिश्रा हिला अटक केली आहे. तिच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
मुक्या प्राण्यांवर आपला जोर दाखवणाऱ्या अशा मानसिकतेच्या लोकांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे, हे आपण विसरता कामा नये.