
Live In Relationship Is Like Gandharva Marriage : लिव्ह-इन संबंध हे भारतीय परंपरेतील गंधर्व विवाहासारखेच आहेत. त्यामुळे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांना कायदेशीर संरक्षणापासून दूर ठेवू नये. योग्य परिस्थितीत त्यांना पत्नीचा दर्जा दिला पाहिजे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी व्यक्त केले.
तिरुचिरापल्ली येथील एका व्यक्तीने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत लिव्ह-इन संबंध ठेवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिची फसवणूक केल्याने त्याला तुरुंगवास झाला. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती श्रीमती म्हणाल्या, 'लिव्ह-इन संबंध भारतीय समाजासाठी एक सांस्कृतिक धक्का आहेत. तरीही ते प्रचलित आहेत. प्राचीन भारतात 8 प्रकारचे विवाह सांगितले आहेत. त्यात परस्पर प्रेम आणि संमतीने एकत्र येण्याचा गंधर्व विवाह हा देखील एक प्रकार आहे. आजच्या लिव्ह-इन संबंधांकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे,' असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, 'सुरुवातीला पुरुष स्वतःला आधुनिक विचारांचे असल्याचे भासवतात. पण जेव्हा संबंध बिघडतात, तेव्हा ते महिलांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. असे पुरुष कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत,' असा इशाराही त्यांनी दिला.