
कोलकाता : कोलकात्याच्या चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत प्रत्यक्षदर्शींनी अंगावर काटा आणणारा थरार सांगितला. सतत पडणारा पाऊस आणि प्रचंड गर्दी यामुळे हा गोंधळ उडाला. पावसापासून वाचण्यासाठी भाविकांनी मंडपात आसरा घेण्याचा प्रयत्न केला आणि पळापळ सुरू झाली.
पाऊस आणि गर्दीमुळे गोंधळ, प्रत्यक्षदर्शींची माहिती
एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना विनय कुमार या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, "तिथे पोलिसांचा बंदोबस्त होता, पण अचानक झालेल्या गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. सततच्या पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली. तिथे खूप गर्दी होती आणि पावसात कुणालाही बाहेर जायचं नव्हतं. पोलीस प्रशासन पूर्णपणे काम करत होतं, पण गर्दी इतकी होती की ती हाताळता आली नाही."
उत्तम नावाच्या दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने घटनेनंतरच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. तो म्हणाला की, पोलीस आणि स्थानिक नागरी स्वयंसेवक (सिव्हिल व्हॉलंटियर्स) लगेच मदतीला धावून आले. स्थानिक आमदारही तिथे पोहोचले आणि त्यांनी जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. "आम्ही इथलेच स्थानिक रहिवासी आहोत. घटनेची माहिती मिळताच आम्ही लगेच इथे आलो. पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी ठेवली होती आणि त्यांनी खूप सहकार्य केलं. स्थानिक स्वयंसेवकही तिथे होते. आमचे स्थानिक आमदारही इथे असून ते जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यासाठी सर्व व्यवस्था करत आहेत. पाऊस आणि स्वतःसह मुलांचा बचाव करण्यासाठी लोकांनी पळापळ केली आणि ही घटना घडली," असं उत्तमने सांगितलं.
दरम्यान, या चेंगराचेंगरी प्रकरणी दुर्गा पूजा आयोजन समितीच्या काही सदस्यांसह १२ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे.
या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पोलीस प्रशासन आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्यावर निशाणा साधला. एक्स (X) वर पोस्ट करत बॅनर्जी यांनी मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी लिहिलं, "FIRST IN MY BLOODLINE! @KolkataPolice, @WBPolice आणि @SuvenduWB यांना लाज वाटली पाहिजे. माँ दुर्गा दुःखी कुटुंबांना बळ आणि सांत्वन देवो, तसेच सर्व जखमींना लवकर आणि पूर्णपणे बरं करो."
टीएमसी नेते कुणाल घोष यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं. बचावकार्य आणि जखमींना वैद्यकीय मदत देणं ही सध्याची प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करत, पक्षाचे कार्यकर्ते पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
"उत्तर कोलकात्यातील चोरबागान पूजेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तिथल्या काही भाविकांना मेडिकल कॉलेजमध्ये आणण्याचं काम सुरू आहे. ही घटना कशी आणि का घडली, हे सगळं नंतर बघू, पण सध्या लोकांचे प्राण वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय; आमचे कार्यकर्ते सहकार्य करत आहेत. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. आम्ही पोलिसांसोबत आहोत. मंडपात अजूनही मदत आणि बचावकार्य करणं गरजेचं आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पूजेच्या वेळी घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे," असं घोष म्हणाले.
या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा समोर येईल, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तपासासाठी घटनास्थळ सील करण्यात आलं असून फॉरेन्सिक टीम, स्पेशल टास्क फोर्स आणि अग्निशमन दल या घटनेची चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री अधिकारी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच, प्रत्येक जखमीला ५ लाख रुपये दिले जातील आणि त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोलकात्याच्या चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपात प्रचंड गर्दी झाल्याने ही घटना घडली. चेंगराचेंगरीच्या कारणांचा तपास अधिकारी करत असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.