
बंगळुरू : हासनाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. के. आर. नगरातील घरकाम करणाऱ्या महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणाची सुनावणी करून शुक्रवारी दोषी ठरवणाऱ्या बंगळुरूच्या जनप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने शनिवारी दुपारी शिक्षेची घोषणा केली. न्यायाधीश गजानन भट्ट यांनी हा आदेश दिला. विशेष म्हणजे प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. घरकाम करणाऱ्या महिलेच्या लैंगिक शोषणात माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांना जन्मठेपेची शिक्षा होण्याचे हे बहुदा पहिलेच प्रकरण आहे.
या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(n) आणि ३७६(२)(k) अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले होते. ही कलमे सतत अत्याचार आणि नोकरी करणाऱ्या महिलेवर झालेल्या अत्याचारासंबंधी आहेत. पहिल्या प्रकरणातच प्रज्वल याच्याविरुद्ध निकाल दिला असून, आणखी तीन प्रकरणे त्याच न्यायालयात विचाराधीन आहेत. या तीन प्रकरणांपैकी एका प्रकरणात प्रज्वल यांचे वडील माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि आई भवानी रेवण्णा यांच्यावरही आरोप असून, प्रकरण विचाराधीन आहे.
यापूर्वी आज सकाळी न्यायालयात युक्तिवाद झाला. प्रकरणात सरकारी वकील बी.एन. जगदीश आणि एसपीपी अशोक नाईक यांनी आपला युक्तिवाद मांडला. यावेळी न्यायालयात आरोपी प्रज्वल रेवण्णा उपस्थित होता. शिक्षेचे प्रमाण कमी करण्याची विनंती स्वतः प्रज्वल आणि त्याच्या वकिलांनी केली होती. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात वकीलांची गर्दी झाली होती.
जनप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध प्रज्वल रेवण्णा उच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतो. उच्च न्यायालयाने या निकालाला स्थगिती दिल्यास, उर्वरित तीन प्रकरणांमध्ये जामीनासाठी ते पुढील कायदेशीर लढा देऊ शकतो.
पण उच्च न्यायालयानेही विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्यास, प्रज्वल रेवण्णासमोर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचाच मार्ग उरतो. पण सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम टेवल्यास, त्याला सुनावलेली शिक्षा भोगावी लागेल.