
रामगढ : एका महिलेच्या जिद्दीची गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये धावण्याची स्पर्धा होती. या महिलेकडे ना धावण्यासाठी चांगले शूज, ना तसे कपडे. पण मनात आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणि त्यासाठी धावण्याची प्रबळ इच्छा होती. तिने कपडे किंवा चप्पल याचा कोणताही विचार न करता केवळ नोकरीसाठी धावण्याची ही शारीरिक चाचणी दिली आणि इतकंच नाही तर जिंकूनही दाखवली.
काय आहे नेमकं प्रकरण?
झारखंडमधील रामगढमध्ये सध्या होमगार्ड भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरू आहे. यात दुलमी ब्लॉकच्या सोसो गावात राहणाऱ्या कविता कुमारी या विधवा महिलेने आपल्या जिद्दीने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
कडक उन्हात साडी नेसून आणि अनवाणी पायाने १६०० मीटरची धाव पूर्ण केल्याने कविता सध्या चर्चेत आली आहे. कोणतीही सोय नसताना तिने ही धाव अवघ्या ६ मिनिटांत पूर्ण केली. यासाठी १० मिनिटांची वेळ देण्यात आली होती.
तिच्या या धावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर एका स्थानिक रनिंग संस्थेने तिचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी तिच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता ही विधवा असून तिच्यावर दोन लहान मुले आणि सासू-सासऱ्यांची जबाबदारी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला ट्रॅकसूट किंवा रनिंग शूज घेणे शक्य नाही. त्यामुळे ती रोज पहाटे ४ वाजता उठून साडीतच धावण्याचा सराव करते.
मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला होमगार्डमध्ये भरती व्हायचे आहे, असे कविताने सांगितले.
Barefoot. In a saree. Running for a Home Guard job. 🥹
No spikes. No tracksuit. No coaching.
Just a dream and her determination.
Ramgarh, Jharkhand 🇮🇳
She ran like her whole future depended on it.
Because it did.
https://t.co/QPgcHnBY2K
— News Matrix (@NewsMatrixIND) October 6, 2026
रामगढ जिल्ह्यात होमगार्डच्या एकूण २८४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया चालणार असून, यात महिलांसाठी ५० टक्के पदे राखीव आहेत. तसेच विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी अतिरिक्त ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
कविताच्या या कहाणीने अनेकांना प्रेरणा दिली आहे. जेव्हा तुमची इच्छाशक्ती प्रबळ असते, तेव्हा परिस्थिती किंवा कपडे तुमच्या ध्येयाच्या आड येऊ शकत नाहीत, हाच संदेश यातून मिळतो.