
कॉलून (हॉंगकॉंग): २०२७ एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीतील एका अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताला injury-time मध्ये स्टीफन परेराच्या पेनल्टी गोलमुळे यजमान हॉंगकॉंगकडून ०-१ असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
सामन्याच्या अखेरच्या क्षणी भारतीय गोलरक्षक विशाल कैथ गोललाईन सोडून पुढे आला आणि मायकेल उदेबुलुझॉर याला चेंडू पासून दूर ढकलण्याच्या प्रयत्नात त्याला धडकला. त्यामुळे रेफरीने हॉंगकॉंगला पेनल्टी दिली. यामुळे कैथला पिवळी कार्डही दाखवण्यात आली.
परिरा यांनी ही संधी साधत चेंडूला कैथच्या उजव्या दिशेने गोलपोस्टमध्ये झोकून दिले.
या सामन्यात भारतीय प्रशिक्षक मॅनोलो मार्केझ यांनी अनुभवी स्ट्रायकर सुनील छेत्री यांना सुरुवातीच्या संघात स्थान दिले नव्हते.
नव्याने बांधलेल्या काई टॅक स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत यजमान हॉंगकॉंगला घरच्या मैदानाचा फायदाही मिळत होता. पहिल्या सत्रात भारताने काही चांगले प्रसंग निर्माण केले, मात्र हॉंगकॉंगकडे चेंडूवर अधिक नियंत्रण होते.
मात्र, सध्या भारतीय संघावर सुरु असलेली फिनिशिंगची समस्या पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. पहिल्या ४५ मिनिटांत मिळालेल्या काही संधीही वाया गेल्या.
३५व्या मिनिटाला लिस्टन कोलाकोने डाव्या बाजूने छान क्रॉस दिला, पण आशिक कुरुनियानने जवळून चेंडू थेट बाहेर मारला.
तत्पूर्वी दुखापतीमुळे थोडा वेळ मैदानाबाहेर गेलेल्या लिस्टन कोलाकोने नंतर मैदानात परत येत एका दीर्घ पल्ल्याच्या फटक्याद्वारे प्रयत्न केला, पण चेंडू थेट गोलरक्षकाच्या हातात गेला.
हॉंगकॉंगनेही सामन्याच्या मध्यंतराच्या अगोदर आत्मविश्वासाने खेळ करत काही संधी मिळविल्या. एकदा तर ते फ्रीकिकवरून आघाडी घेऊ शकले असते, पण विशाल कैथला चुकविल्यानंतर अॅसिश रायने गोललाईनवरून वेळेवर क्लिअरन्स दिला.
दोनही संघांना संधी मिळाल्या असल्या, तरी पहिल्या सत्रात कोणीही गोल करू शकले नाही.
दुसऱ्या सत्रातही भारताकडे काही चांगल्या संधी होत्या. आशिक कुरुनियानने आणखी एक संधी मिळवली होती, पण तीही वाया गेली.
यानंतर प्रशिक्षक मॅनोलो मार्केझ यांनी भारताचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू सुनील छेत्री आणि नाओरेम सिंग यांना मैदानात उतरवले. त्यांनी कुरुनियान आणि ब्रँडन फर्नांडिस यांची जागा घेतली.
८१व्या मिनिटाला ललियानझुला छांगतेने छेत्रीला बॉक्समध्ये एक उत्कृष्ट कटबॅक पास दिला होता, पण छेत्रीने त्या संधीचा योग्य फायदा घेता आला नाही.
मार्च महिन्यात बांगलादेशविरुद्ध गोलरहित बरोबरीनंतर भारताचा हा दुसरा पात्रता सामना होता. मात्र या पराभवामुळे भारताच्या आशियाई चषक पात्रतेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.