
नवी दिल्ली : 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत आपला स्वातंत्र्यदिन साजरा करेल, पण एक प्रश्न सगळ्यांनाच पडतो तो असा की हा 79वा स्वातंत्र्य दिन असेल की 80वा? याचं अचूक उत्तर आहे, 80वा स्वातंत्र्य दिन.
२०२६ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होतील, पण आपण ८०वा स्वातंत्र्य दिन साजरा करू. हे आकडे गोंधळात टाकणारे वाटत असले तरी, दोन्ही बरोबर आहेत. कसं ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून हा दिवस आपण 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करतो. त्यामुळे, 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा 'पहिला' स्वातंत्र्य दिन होता. आणि इथूनच मोजणी सुरू झाली.
15 ऑगस्ट 2025 रोजी भारताने 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 ऑगस्ट 2025 रोजी केलेल्या भाषणात '79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला' असा स्पष्ट उल्लेख केला होता. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) सुद्धा 15 ऑगस्ट 2025 ला 79 वा स्वातंत्र्य दिन म्हटलं होतं.
15 ऑगस्ट 1947 हा पहिला स्वातंत्र्य दिन मानला गेल्यामुळे, आपण 1947 पासूनच मोजणी करतो.
त्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल.
पण मग 79 हा आकडा कुठून आला? तर 1947 पासून 2026 पर्यंत मोजल्यास स्वातंत्र्याची एकूण 79 वर्षे पूर्ण होतात. याचा अर्थ, 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत स्वातंत्र्याची 79 वर्षे पूर्ण करून 80 व्या वर्षात पाऊल ठेवेल.
भारताला स्वातंत्र्य मिळालं ते वर्ष - 1947
स्वातंत्र्याची पूर्ण झालेली वर्षे - 79 वर्षे (कारण पहिलं वर्ष 1948 मध्ये पूर्ण झालं)
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव : 80 वा (कारण पहिला उत्सव 1947 मध्येच झाला)
थोडक्यात सांगायचं तर, 15 ऑगस्ट 2026 हा भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन असेल, जो स्वातंत्र्याची 79 वर्षे पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे यात कोणताही गोंधळ नाही, फक्त आकडे मोजण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत.