या व्हिडीओच्या सुरुवातीला पॅराग्लायडर पायलट एका हातात सेल्फी स्टिक धरून व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेच्या वाढदिवसाबद्दल सांगत आहे. "मॅडम जी का बर्थडे है आज, केक कटने वाला है भाई. गिराना नही है," असं तो हसत हसत तिला केक न पाडण्याची आठवण करून देत म्हणतो. त्यानंतर तो पुढे सांगतो की ती ४४ वर्षांची होत असून आकाशात आपला वाढदिवसाचा केक कापत आहे.
त्यानंतर ती केक कापते, एक तुकडा खाते आणि ते दोघेही हॅपी बर्थडे गाणं गातात. ती त्या व्यक्तीलाही केक विचारते, पण तो हसून नकार देत 'लँडिंगनंतर खाईन' असं सांगतो.
राहुल महाजन यांनी २७ नोव्हेंबर रोजी एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हिमाचल प्रदेशमधील लोकप्रिय अॅडव्हेंचर टुरिझम डेस्टिनेशन असलेल्या बीर बिलिंगमध्ये टँडम पॅराग्लायडिंग करताना ही महिला हवेत आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
उडताना कोणीतरी केक कापत असल्याचं दृश्य पाहून टँडम फ्लाईट्सदरम्यान ऑपरेटर कोणती काळजी घेतात आणि यावर कोणाचं नियंत्रण असतं, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाजन यांनी आपल्या पोस्टमध्ये टेक-ऑफच्या वेळी केक कसा नेला यावर प्रश्न उपस्थित करत सुरक्षेची जबाबदारी कोणाची यावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच साहसी पर्यटनाला मनोरंजनाचे साधन मानू नका, कारण यात मोठे धोके असतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.