
नवी दिल्ली : सध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह आहे. मुलांना दसऱ्याची सुट्टी लागलीये. त्यामुळे अनेक जण कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. ग्रेटर नोएडामध्येही एका कुटुंबाने रात्री एकत्र नूडल्स खाल्ले. त्यानंतर चहा पीत गप्पा मारल्या आणि सगळे झोपायला गेले. पण आज (१७ ऑक्टोबर) सकाळी आई-वडील आणि तीन मुलं उठलेच नाहीत. या पाचही जणांचे मृतदेह घरात आढळले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार 'फूड पॉयझनिंग'चा (विषबाधा) असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या कुटुंबाने रात्री नूडल्स खाल्ले होते. याच नूडल्समुळे त्यांना विषबाधा झाली का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये ३७ वर्षांचा महेश, त्याची ३५ वर्षांची पत्नी ललिता, ११ वर्षांचा मुलगा लड्डू, ७ वर्षांची मुलगी मिष्टी आणि ३ वर्षांच्या एका लहानग्याचा समावेश आहे.
महेशच्या आईने आणि शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. आपण रात्री नूडल्स खाल्ल्याचं महेशने फोनवरून आईला सांगितलं होतं. पण त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी आता तपास वेगवान केलाय. अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमने अन्नाचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
आज सकाळी शेजाऱ्यांना संशय आला. रोज सकाळी हे कुटुंब लवकर उठून आपापल्या कामाला लागायचं. पण आज घरातून काहीच हालचाल जाणवली नाही. ते कुठे बाहेर जाणार असतील तर शेजाऱ्यांना सांगून जायचे, पण तशीही काही माहिती त्यांनी दिली नव्हती. काल रात्री शेजाऱ्यांनी महेश आणि त्याच्या कुटुंबाला पाहिलं होतं. त्यामुळे त्यांचा संशय आणखी वाढला. त्यांनी महेशला फोन केला, घरात फोन वाजत होता पण कोणीच उचलत नव्हतं. अखेर स्थानिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा पाचही जण बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती आणि श्वासही थांबला होता. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले.
महेश आणि त्याच्या कुटुंबाने शुक्रवारी रात्री नूडल्स खाल्ले होते. झोपण्यापूर्वी त्यांनी चहाही प्यायला होता. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची दाट शक्यता आहे. पण ही विषबाधा नेमकी कशी झाली किंवा त्यांच्या शरीरात विष कसं गेलं, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.