राणेंनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना ऑन दी स्पॉट केले सस्पेंड, निर्णयाला तात्पूरती स्थगिती

Published : Jun 08, 2025, 03:49 PM IST
Vishwajit Rane

सार

डॉक्टर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यावर झालेली कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पणजी - गोवा मेडिकल कॉलेजमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांशी गैरवर्तनाच्या तक्रारींनंतर गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी अचानक भेट दिली आणि एक डॉक्टर निलंबित करण्याचे आदेश दिले. मात्र, ही कारवाई ऑन-कॅमेरा झाली आणि त्यानंतर राज्यात वैद्यकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली. डॉक्टर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यावर झालेली कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अचानक पाहणी, थेट कारवाई

आरोग्यमंत्री राणे यांचा दौरा सुरू असताना त्यांना एका पत्रकाराने फोन करून गोमेकॉमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार केली. त्यावर त्वरित प्रतिसाद देत राणे यांनी डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना बोलावून, कॅमेरासमोर जाब विचारला. संवादादरम्यान मंत्री राणे यांनी डॉक्टरला मास्क काढायला सांगितले, आणि स्पष्टपणे म्हटले की, “स्पष्टीकरण चौकशी समितीत द्या, तोपर्यंत निलंबन.” त्यांनी डॉक्टरला घरी जाण्याचा आदेश दिला आणि विरोध केल्यास सुरक्षारक्षकांद्वारे बाहेर काढण्याचा इशाराही दिला.

सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी मंत्री राणेंच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "डॉक्टरला समोरच अपमानित करणं, त्याची बाजू न ऐकता निलंबन करणं, हे लोकशाहीविरोधी आणि हिणकस आहे", असे मत अनेक डॉक्टर संघटनांनी नोंदवले.

डॉक्टर संघटनांचा विरोध व संपाचा इशारा

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय वैद्यकीय महासंघ यांनी मंत्री राणेंच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी म्हटलं, “फक्त एका पत्रकाराच्या तक्रारीवरून, कोणतीही पूर्व चौकशी न करता डॉक्टरला जाहीरपणे झापणे, ही मनमानी आहे. यामुळे वैद्यकीय समुदायात भीतीचं वातावरण तयार होईल.”

संघटनांनी डॉक्टरची जाहीर माफी मागण्याची मागणी केली असून, आपत्कालीन विभागात बिगर वैद्यकीय व्यक्तींचा प्रवेश बंद करण्याचीही मागणी लावून धरली आहे. अन्यथा, संपाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची चर्चा, निलंबनाला स्थगिती

या वादानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या निलंबनावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणात सखोल चौकशी करूनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मंत्री विश्वजीत राणे यांचे स्पष्टीकरण

झालेल्या वादळानंतर मंत्री राणे यांनी रात्री उशिरा स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं, “मी एका ज्येष्ठ महिलेसोबत झालेल्या गैरवर्तनाविरुद्ध उभा राहिलो. त्या महिलेला नीट वागणूक मिळाली नाही, म्हणून मी संतापलो. मी ज्या पद्धतीने डॉक्टरशी बोललो, त्याची जबाबदारी घेतो. पण मी ती रुग्ण महिला आणि तिच्या नातलगाच्या बाजूने उभा राहिलो, याची माफी मी मागणार नाही.”

व्यवस्थापन की राजकीय हस्तक्षेप?

या प्रकरणातून एक प्रश्न पुन्हा समोर आला आहे – रुग्णसेवा आणि शिस्त यामधील समतोल कुठे ठेवायचा? सत्ताधाऱ्यांनी रुग्णांच्या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात, पण त्याचवेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठाही जपावी, ही अपेक्षा आता वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

4 वर्षांच्या मुलाला आंघोळ घालताना आई-लेकाचा मृत्यू, गॅस गिझरने घेतला दोघांचा जीव!
Goa Club Fire : गोव्यातील आग लागलेल्या क्लबचे दोन्ही मालक देश सोडून फरार, पोलिसांकडून मोठी कारवाई सुरू