
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर दिसू लागला आहे. मागील काही आठवड्यांपासून थोडीशी शांतता दिसत असली, तरी आता परिस्थिती हळूहळू बदलताना जाणवतेय. गेल्या २४ तासांत ६८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने ३१ मे रोजी सकाळी ८ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ३,३९५ वर पोहोचली आहे. याच काळात १,४३५ रुग्णांनी कोरोवर मात करत घरी परतण्यास मिळवलेली परवानगी ही दिलासा देणारी बाब असली, तरी मृत्यूची संख्या काहीशी चिंता वाढवणारी आहे.
केरळने पुन्हा एकदा रुग्णसंख्येत आघाडी घेतली आहे. केवळ गेल्या २४ तासांत १८९ नवीन रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. त्याखालोखाल कर्नाटक (८६), पश्चिम बंगाल (८९), दिल्ली (८१) आणि उत्तर प्रदेश (७५) या राज्यांमध्येही नव्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
केरळ – १३३६
महाराष्ट्र – ४६७
दिल्ली – ३७५
गुजरात – २६५
कर्नाटक – २३४
पश्चिम बंगाल – २०५
तामिळनाडू – १८५
उत्तर प्रदेश – ११७
इतर राज्यांमध्ये संख्येत काहीशी घट आहे, मात्र धोका टळलेला नाही.
आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना टेस्टिंग वाढवण्याचे, अलर्ट राहण्याचे व संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, गर्दीपासून दूर राहणे, तसेच स्वच्छता नियम पाळणे यास पुन्हा एकदा महत्त्व दिलं जात आहे.
शाळांमध्ये कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सरकारने खालील उपाययोजना सुचवल्या आहेत:
नियमित हात धुणे व सॅनिटायझरचा वापर
खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे (स्लीव्ह किंवा रुमालाचा वापर)
लक्षणे दिसल्यास घरीच विश्रांती घेणे आणि आवश्यक असल्यास टेस्ट करून घेणे
गरज भासल्यास मास्कचा वापर
लहान मुलांमध्ये जनजागृती करणे
कोणतीही लक्षणे (ताप, खोकला, सर्दी, थकवा) दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या – स्वतःही जबाबदारीने वागा.
मास्क, हात धुणे, सामाजिक अंतर या सवयी पुन्हा अंगी बाणवा.
कोरोना अजूनही आपल्यामध्ये आहे, फक्त थोड्या वेगळ्या स्वरूपात. सध्या जरी परिस्थिती तितकीशी गंभीर वाटत नसेल, तरी थोडीशी बेफिकीरी मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते. म्हणूनच, जागरूक राहा, सुरक्षित राहा आणि सरकारी सूचनांचे पालन करा!