
नवी दिल्ली : 'कचऱ्यातून कलाकुसर' हे आपण अनेकदा ऐकलं असेल. पण याच कचऱ्यातून हजारो कोटी रुपये कमावता येऊ शकतात, यावर तुमचा विश्वास बसेल का? सामान्य माणसाला हे अशक्य वाटेल. पण केंद्र सरकारने हे शक्य करून दाखवलंय. सरकारने नुसती कचरामुक्तीच केली नाही, तर त्यातून हजारो कोटींची कमाईही केली आहे. गेल्या ५ वर्षांत भंगार आणि कचरा गोळा करून सरकारच्या तिजोरीत तब्बल ६ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज दिली.
नवी दिल्लीत आज 'विशेष स्वच्छता अभियान ६.०' ची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत आम्ही कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं हे शिकलो आहोत. कचरा नुसता फेकून न देता, त्यावर प्रक्रिया करून तो बाजारात आणला जातोय आणि त्यातून सरकारला चांगला महसूल मिळतोय."
"२०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या अभियानाची सुरुवात केली होती. बघता बघता या मोहिमेचं एका मोठ्या लोकचळवळीत रूपांतर झालं. जुन्या अनुभवांवरून शिकत आम्ही दरवर्षी ही मोहीम पुढे नेत आहोत," असं मंत्री म्हणाले. यावर्षीही या अभियानाला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. दरवर्षी कामाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या ६ वर्षांपासून सलग एक महिना विशेष स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यासाठी २ ऑक्टोबर (गांधी जयंती) ते ३१ ऑक्टोबर (सरदार पटेल जयंती) हा काळ निवडण्यात आला. या मोहिमेचं वेळोवेळी मूल्यमापन केलं जातं. तसेच, जुन्या मोहिमांमधून मिळालेल्या अनुभवांचा वापर करून यात नवनवीन गोष्टींचा समावेश केला जातो, असंही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं.