
कोची: कोची किनाऱ्याजवळ मालवाहू जहाज अपघातग्रस्त झाल्याची अधिक माहिती समोर आली आहे. लायबेरियन ध्वजाखालील एमएससी एल्सा-३ हे फीडर जहाज अपघातग्रस्त झाले. जहाजावर ४०० हून अधिक कंटेनर होते. जहाजावरील २४ कर्मचाऱ्यांपैकी २१ जणांना वाचवण्यात आले आहे. उर्वरित तीन जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीन कर्मचारी अजूनही जहाजावर आहेत.
कोची किनाऱ्यापासून ३० नॉटिकल मैल अंतरावर अरबी समुद्रात जहाज अपघातग्रस्त झाले. जहाजाची एक बाजू पूर्णपणे झुकलेल्या अवस्थेतील दृश्ये समोर आली आहेत. जहाज सध्या बुडालेले नाही आणि ते स्थिर आहे, अशी माहिती कोस्ट गार्डने दिली आहे.
जहाजावर २० फिलिपिन्स नागरिक, दोन युक्रेनियन नागरिक, एक जॉर्जियन नागरिक आणि रशियन कॅप्टन होते. कंटेनरमध्ये विविध प्रकारचा माल होता. त्यात काही धोकादायक इंधन असल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी कोस्ट गार्डची जहाजे आणि डोर्नियर विमाने घटनास्थळी पोहोचली आहेत. जीवरक्षक उपकरणे जहाजावर टाकून बचावकार्य सुरू आहे. विझिंजम बंदरातून कोचीला जाणारे फीडर जहाज अपघातग्रस्त झाले आहे.
कोचीतून तूतीकोरीनला जाणारे हे जहाज होते. आज रात्री दहा वाजता ते कोचीत पोहोचणार होते. कंटेनरमध्ये मरीन गॅस ऑइलसारखे धोकादायक इंधन असल्याची माहिती आहे. याशिवाय मरीन इंधन प्रकारातील लो सल्फर फ्युएल ऑइलही असल्याची माहिती कोस्ट गार्डने दिली आहे. कोलंबोहून आलेले लायबेरियन ध्वजाखालील जहाज होते. १८३.९१ मीटर लांब आणि २५.३ मीटर रुंद असलेले हे फीडर सर्व्हिस प्रकारातील जहाज होते. विझिंजम येथे मदरशिपने आणलेले उत्पादने भारतातील विविध बंदरांवर पोहोचवण्यासाठी अपघातग्रस्त कंपनीच्या मालकीच्या फीडर जहाजांचा वापर केला जातो.