
शनिवारी राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शनं केली. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा भाजपने निषेध केला. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, "पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी राहुल गांधी इतक्या खालच्या पातळीवर गेले आहेत की, आता ते देशाच्या विरोधातच आंदोलन करू लागले आहेत... एआय समिट हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता, तो एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होता."
दुसरीकडे, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं, "काँग्रेसच्या या कृत्याला देशातील जनता माफ करणार नाही. एआय समिटसाठी ८० पेक्षा जास्त देशांमधून लोक आले होते आणि सर्वांनी भारताच्या प्रयत्नांचं मनापासून कौतुक केलं आहे."
दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी काँग्रेसवर 'तरुणविरोधी' असल्याची टीका केली. भारत मंडपममध्ये एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर ते बोलत होते. वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितलं की, त्यांनी एआय समिटमधील प्रदर्शनकर्त्यांशी (exhibitors) संवाद साधला असता, सर्वांनीच युवक काँग्रेसच्या कृत्याचा निषेध केला. ते म्हणाले, "एआय समिटमध्ये अनेक तांत्रिक उपाय आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप्सनी भाग घेतला आहे... समिटच्या पाचव्या दिवशीही लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे... मी जेव्हा अनेक प्रदर्शनकर्त्यांशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्याप्रकारे गोंधळ घातला, तो लाजिरवाणा होता. सर्वांनी त्याचा निषेध केला. यावरून दिसतं की राजकारणात काँग्रेस किती खालच्या पातळीवर जात आहे. काँग्रेस पक्ष हा तरुणविरोधी आहे."
शुक्रवारी भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत मंडपममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात 'शर्टलेस' आंदोलन केलं. एआय इम्पॅक्ट समिटवर टीका करत, पंतप्रधानांनी 'तडजोड' केली असल्याचा आरोप त्यांनी केला. निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी आपले शर्ट काढले होते.
याआधी, भारतीय युवक काँग्रेसने एका निवेदनात म्हटलं होतं की, 'ज्या पंतप्रधानांनी एआय समिटमध्ये देशाची ओळख विकली आहे, त्या तडजोड केलेल्या पंतप्रधानांविरोधात' त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. "भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशाची ओळख विकणाऱ्या तडजोड केलेल्या पंतप्रधानांविरोधात आवाज उठवला आणि आंदोलन केलं," असं भारतीय युवक काँग्रेसच्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटलं आहे.