
Bihar Assembly Election 2025 : आज 6 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. 3.75 कोटी मतदार 1,314 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. पहिल्या टप्प्यात महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि RJD नेते तेजस्वी यादव, त्यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव, गायक आणि अभिनेत्यातून नेते बनलेले खेसारी लाल यादव आणि भाजपचे सम्राट चौधरी यांसारखी मोठी नावे निवडणूक रिंगणात आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या जागेवर कशी लढत आहे आणि मतांचे गणित काय सांगते...
पहिल्या टप्प्यातील सर्वात मोठी लढत इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव आणि भाजपचे सतीश कुमार यांच्यात आहे, ज्यांनी 2010 मध्ये तेजस्वी यांच्या आई राबडी देवी यांचा पराभव केला होता. तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात आहेत. याशिवाय प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे चंचल सिंहही याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत. तर, तेज प्रताप यादव यांच्या जागेवर बहुरंगी लढत आहे. तेज प्रताप यांनी आपला नवा पक्ष 'जनशक्ती जनता दल' स्थापन केला असून ते महुआ मतदारसंघातून मैदानात आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आरजेडी आमदार मुकेश रौशन हे मोठे आव्हान आहेत. या जागेवर लोजपा (रामविलास) चे संजय सिंह आणि अपक्ष अशमा परवीन यांच्या प्रवेशामुळे लढत आणखीच चुरशीची झाली आहे.
पहिल्या टप्प्यात बिहार सरकारचे अनेक मंत्री आहे. उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा लखीसरायमधून, तर सम्राट चौधरी तारापूरमधून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते मंगल पांडे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. सिवान जागेवर त्यांची लढत आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांच्याशी आहे.
रघुनाथपूर: दिवंगत बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब मैदानात आहे. एनडीएने याला जंगलराजचे पुनरागमन म्हटले आहे.
मोकामा: तुरुंगात असलेले जदयू आमदार अनंत सिंह यांचा सामना बाहुबली सूरजभान सिंह यांच्या पत्नी आणि आरजेडीच्या वीणा देवी यांच्याशी आहे.
छपरा: भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव आरजेडीकडून निवडणूक लढवत आहेत.
करगहर: भोजपुरी गायक रितेश पांडे जन सुराज पक्षाचे उमेदवार आहेत.
अलीगंज: लोकगायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.