
नवी दिल्ली - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दुःख आणि संतापाच्या गर्तेत आहे. सामान्य जनतेपासून ते विरोधी पक्षांपर्यंत सर्वजण एकजुटीने मोदी सरकारला कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देत आहेत. या घटनेनंतर ९ दिवस उलटूनही पहलगामचे दहशतवादी पकडले गेले नसल्याने जनआक्रोश वाढत आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी एका उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला फ्री हँड देण्याची घोषणा केली होती. गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांनीही शोधून शोधून सूड उगवण्यात येईल आणि प्रत्येकाचा हिशोब घेतला जाईल, असे सांगितले. हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, कोणीही सुटणार नाही, असे म्हटले आहे.
तर एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे केंद्र सरकारला आवाहन केले आहे. भाजप नेहमी म्हणते की घर मे घुसके मारेंगे. परंतु, आता केवळ घर में घुसकर नव्हे तर घरात घुसून तेथेच बसायचे आहे. थांबायचे आहे, असे म्हटले आहे.
गृहमंत्री शाह गुरुवारी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, दहशतवादाविरुद्धची लढाई तो पूर्णपणे नष्ट होईपर्यंत सुरूच राहील.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. २३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या (CCS) बैठकीत या हल्ल्याचा गांभीर्याने आढावा घेण्यात आला. यामध्ये असेही सांगण्यात आले की, हल्ल्याचे तार सीमापार जोडलेले आहेत.
सरकारने हल्ल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यात सिंधू जल कराराची (सिंधू जल करार) स्थगिती हा सर्वात मोठा निर्णय आहे. हा पाकिस्तानला कडक संदेश देण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे.
शाह म्हणाले की, हे नरेंद्र मोदी सरकार आहे, कोणीही सुटणार नाही. प्रत्येकाला शोधून उत्तर दिले जाईल. भारताची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे आणि यात संपूर्ण देश आणि जग भारतासोबत उभा आहे. १९९० पासून काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्यांना सोडले जाणार नाही.
शाह हे बोडोफ जमातीचे नेते उपेंद्रनाथ ब्रह्म यांच्या स्मरणार्थ आयोजित रस्त्याच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. गृहमंत्र्यांनी असेही म्हटले की, भारताच्या या लढाईत केवळ १४० कोटी भारतीयच नाहीत तर संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. हा एक जागतिक संदेश आहे की दहशतवाद हा एका देशाची समस्या नसून संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे.