
बंगळुरू : आजकाल ऑनलाइन किराणा मागवणे अगदीच सामान्य झाले आहे. घरबसल्या मोबाइलवर हवे ते निवडून मागवता येते. पण याच ऑनलाइन शॉपिंगमुळे एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला आहे. अॅमेझॉनवर जास्त किराणा वस्तूंची ऑर्डर दिल्याने डिलिव्हरी एजंट ग्राहकावर भडकला, असा आरोप होत आहे. एवढेच नाही, तर ऑर्डरमधील काही वस्तू न देताच तो निघून गेला, अशी तक्रार ग्राहकाने केली आहे.
ही घटना बंगळुरूमध्ये घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. एका ग्राहकाने महिन्याच्या किराणा खरेदीचा भाग म्हणून अॅमेझॉन मिनिट्सवरून सुमारे १६ वस्तूंची ऑर्डर दिली होती. यामध्ये तांदूळ, पीठ, खाद्यतेल, पनीर, कॉफी, डाळ आणि साबण अशा अनेक आवश्यक वस्तू होत्या.
पण ऑर्डर घेऊन आलेल्या डिलिव्हरी एजंटने मात्र नाराजी व्यक्त केली. त्याने विचारले की, 'एवढ्या वस्तू एकाच वेळी का मागवल्या? फक्त २५० ची सवलत मिळवण्यासाठी एवढे सगळे विकत घेतलेत का?'
शिवाय, एवढ्या सगळ्या वस्तू दुचाकीवरून आणायला खूप त्रास होतो. एकाच वेळी मोठी ऑर्डर देण्यापेक्षा वेगवेगळ्या वेळी छोट्या ऑर्डर्स देता आल्या असत्या, असे डिलिव्हरी बॉयने सुनावले, असे ग्राहकाने रेडिटवर शेअर केले आहे.
डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला डिलिव्हरी बॅगमधून वस्तू काढण्यास सांगितले, ज्याला ग्राहकाने होकार दिला. मात्र, डिलिव्हरी बॉयने स्वतःच वस्तू काढून जोराने जमिनीवर फेकल्या, असा ग्राहकाचा आरोप आहे. या वर्तनामुळे आपल्याला धक्का बसल्याचे त्याने म्हटले आहे.
डिलिव्हरीचे काम कठीण असते हे आपल्याला समजते, पण ग्राहकाने अॅपद्वारे ऑर्डर दिल्यावर ती स्वीकारून पाठवणे ही कंपनीची जबाबदारी आहे. यासाठी ग्राहकाला दोषी ठरवणे योग्य नाही, असे मत त्याने व्यक्त केले.
ही घटना इथेच संपली नाही. नंतर जेव्हा ग्राहकाने ऑर्डर लिस्ट तपासली, तेव्हा अनेक वस्तू डिलिव्हर झाल्या नसल्याचे त्याच्या लक्षात आले. हे समजल्यानंतर त्याने आणखी संताप व्यक्त केला.
ग्राहकाची पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काहींनी ग्राहकाला पाठिंबा देत, आवडत्या वस्तू मागवण्याचा ग्राहकाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी डिलिव्हरी स्टाफच्या कामाचा ताणही समजून घ्यायला हवा, असे मत मांडले आहे.
मोठ्या ऑर्डर्स हाताळण्याची योग्य व्यवस्था कंपनीनेच करायला हवी, जेणेकरून ग्राहक आणि डिलिव्हरी स्टाफ दोघांनाही त्रास होणार नाही, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.
या घटनेमुळे ऑनलाइन डिलिव्हरी सेवांमध्ये ग्राहकांच्या अपेक्षा आणि डिलिव्हरी स्टाफच्या कामाचा ताण यामधील संतुलनावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.